महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे : माजी मंत्री राजकुमार बडोले 

0
20

बोधगया येथे सुरू असलेल्या शांततामय आंदोलनात राजकुमार बडोले यांचा सहभाग

गोंदिया,दि.०८- महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे आणि बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांवर राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी घेऊन बोधगया येथे आंदोलन अत्यंत शांततामय वातावरणात सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार व राजकुमार बडोले फाउंडेशन चे मार्गदर्शक राजकुमार बडोले यांनी ऐतिहासिक धम्मयात्रा — “धम्मचर्या” — दीक्षाभूमी (नागपूर) ते महाबोधी महाविहार, बुद्धगया (बिहार) दरम्यान सुरू केली होती. या यात्रेमुळे नवयुवकांमध्ये बौद्ध विचारधारा अधिक दृढ होईल आणि जागृती निर्माण होणार आहे.

बोधगया मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे संपूर्ण जगभरातील बौद्ध धर्मीयांचे ते श्रद्धास्थान आहे. परंतु 1949 साली लागू झालेल्या बौद्ध मंदिर कायद्यामुळे या मंदिराच्या व्यवस्थापनात बौद्धांसोबत इतर धर्मीय सदस्यांचाही समावेश करण्यात आला. याला विरोध म्हणून बौद्ध भिक्षूंनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शांततामय आंदोलन बोधगया येथे सुरू केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील बौद्ध उपासक-उपासिकांचा जत्था बोधगया येथे जाऊन आंदोलनात सहभागी झाला होता.

सरकारसोबत चर्चा करणार : राजकुमार बडोले यांचे आश्वासन

सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या विषयावर राज्यसरकारचे लक्ष्य वेधणार असल्याचे यावेळी राजकुमार बडोले यांनी सांगितले. तसेच विविध मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन १९४९ मधे लागू झालेल्या बौद्ध मंदिर कायद्यात सुधारणा करण्यासाठी विनंती देखील राजकुमार बडोले करणार आहे.