वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारकाचे भव्य अनावरण सोहळा उत्साहात

0
26

*आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण, सुकळी नाक्यावरील चौकाला “महाराणा प्रताप चौक” असे नामकरण

चित्रा कापसे
तिरोडा —वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली वीर महाराणा प्रताप यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सुकळी नाका येथील गोंदिया-तुमसर मार्गावरील चौकात हे स्मारक उभारण्यात आले असून, याच ठिकाणी चौकाचे नावही “वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक” असे घोषित करण्यात आले.
या गौरवशाली प्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या भाषणात महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रभक्तीवर प्रकाश टाकला. त्यांनी असेही सांगितले की, “महाराणा प्रताप हे केवळ इतिहासातील एक योद्धा नव्हते, तर स्वातंत्र्य व स्वाभिमानाचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी हे स्मारक म्हणजे आपल्या समाजाचा त्यांना मानाचा मुजरा आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात विधीवत पूजा-अर्चनेने करण्यात आली. स्थानिक पंडितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची पूजा,हवन व स्तुती करण्यात आली. या धार्मिक विधीनंतर आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण झाले. स्मारक अनावरणानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप यांना अभिवादन केले.कार्यक्रमास क्षत्रिय राजपूत समाजाचे शेकडो सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष संजयसिंह बैस, अजयसिंह गौर, विनोद परमार, झलेद्रसिंह चौव्हान, झामसिंह चौव्हान, आनंदसिंह बैस, अजयसिंह तोमर, देवेंद्रसिंह गहेरवार, शैलेंद्रसिंह गौर, संजय परमार, आनंद गहेरवार, राजेश गुनेरिया,सलीम जवेरी ,अशोक असाटी, देवेंद्र तिवारी,विजय बनसोड, बाळू येरपुडे, दिलीप असाटी,निखील बैस, ममता बैस, ज्योती बैस, योगिता तोमर आणि रश्मी गौर,हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश जयस्वाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संजयसिंह बैस यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे आश्वासन दिले.