विद्यापीठ माजी विद्यार्थी समितीच्या माध्यमातून परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार

0
8
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्यासह आता रोजगार प्राप्त होणार आहे. माजी विद्यार्थी समितीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत मंगळवार, दि. १३ मे २०२५ रोजी सामंजस्य करार (MoU) केला आहे. माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी परम ग्रुपचे प्रकल्प प्रमुख श्री गणेश पवार यांच्या समवेत एमओयूचे हस्तांतरण केले.‌
जमनालाल बजाज प्रशासकीय भावनातील सभाकक्षात आयोजित कार्यक्रमाला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आयआयएल प्रभारी संचालक डॉ. निशिकांत राऊत, शिक्षण मंचच्या अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे, शिक्षण मंचचे महामंत्री डॉ. सतीश चाफले, माजी विद्यार्थी समितीचे डॉ. पांडुरंग डांगे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगेश भुते, डॉक्टर देवराम नंदनवार, अधिसभा सदस्य डॉ. रतिराम चौधरी, डॉ. आशिष टिपले, डॉ. अनंत पांडे, डॉ. नितीन माथनकर, परम ग्रुपचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर श्री. सचिन शिंदे व विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती. प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार तसेच स्वयंरोजगार प्राप्त व्हावा याकरिता कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. रोजगार नसलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करून नामांकित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न परम स्किल ट्रेनिंग इंडिया कडून केला जाणार आहे. पुढील ५ वर्षात नवीन विद्यार्थ्यांना रोजगारयुक्त निःशुल्क कौशल्य प्राप्त करून देत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योगांमध्ये परम स्किल ट्रेनिंग इंडिया कडून रोजगार मिळवून दिला जाणार आहे. प्राथमिक टप्प्यात विद्यापीठ शैक्षणिक परिसरासह नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण ७ ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत. यानंतर वर्धा, भंडारा व गोंदिया येथे देखील परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत. बारावी ते पदवी मधील कोणत्याही शाखेच्या, कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यास याकरिता निःशुल्क प्रवेश मिळणार आहे. यामध्ये ३ महिन्यांचे कौशल्य अभ्यासक्रम शिकविले जाणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योगांमध्ये १०० टक्के रोजगार-स्वयंरोजगार प्राप्त करून दिला जाणार असल्याचे परम ग्रुपचे प्रकल्प संचालक श्री. गणेश पवार यांनी सांगितले. प्रथम टप्प्यात मल्टी स्किल टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने डेटा सायन्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नर्सिंग असे आजच्या युगात नोकरीसाठी उपयुक्त अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना सामंजस्य कराराच्या माध्यमातून रोजगार प्राप्त करून दिला जाणार आहे.