देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी व गोंदिया शहर ठाणे अव्वल : शंभर दिवस कृती कार्यक्रम

0
27

गोंदिया : जानेवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने शंभर दिवस कृती कार्यक्रम राबविण्यात आला. यात देवरी उपविभागीय कार्यालय व गोंदिया शहर पोलिस स्टेशनने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. यांनी राबविलेला सात कलमी कार्यक्रम प्रभावी ठरला आहे. शासनाने १०० दिवसांचा सात कलमी सुधारणा कार्यक्रम आखून दिला होता. यात नागपूर विभाग स्तरावर दुसऱ्या टप्प्यात तालुका क्षेत्रीय स्तरावर सुधारणा मूल्यमापन कार्यक्रमात देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रथम तर तिरोडा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय तृतीय आणि पोलिस स्टेशन स्तरावर पोलिस ठाणे गोंदिया शहर प्रथम तर पोलिस ठाणे तिरोडा तृतीय ठरला. या मोहिमेंतर्गत क्षेत्रीय कार्यालयासाठी गोंदिया शहर पोलीस ठाणे संकेतस्थळ, कार्यालयीन सुधारणा, नागरिकांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सेवांचे सुलभीकरण, जुन्या अभिलेखांचे निंदनीकरण व निर्लेखन, कालबाह्य वस्तू व वाहनांची विल्हेवाट, कार्यालयाने राबविलेल्या नावीन्यपूर्ण योजना आदी विषयांवर कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेली शंभर दिवसांची मुदत १६ एप्रिल रोजी संपल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील क्षेत्रीय शासकीय कार्यालये ज्यात नागपूर विभाग स्तरावरील जिल्हा पोलिस दलातील तालुका स्तरावरील कार्यालयाने केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथम पोलिस अधीक्षक कार्यालय, नंतर नागपूर परिक्षेत्र, कार्यालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले. त्यात ३ कार्यालयांची निवड करण्यात आली होती.

कुशल नेतृत्वाचे फळ

पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या कुशल नेतृत्व, मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय देवरी, तिरोडा, पोलिस ठाणे गोंदिया शहर आणि पोलिस ठाणे तिरोडा येथील पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीने हे यश मिळाले आहे.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, साहिल झरकर, पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, अमित वानखेडे तसेच सहायक पोलिस निरीक्षक ओम गेडाम, नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांचे कौतुक केले आहे.