खैरबंदा व संग्रामपूर तलावअंतर्गत नहराची दुरुस्ती करा-आ.विजय रहांगडाले

0
192

चित्रा कापसे/तिरोडा,दि.२८ मेः तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सिंचनविषयक समस्या मार्गी लावून खैरबंदा व संग्रामपूर तलावअंतर्गत नहराची दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी अशी भूमिका आमदार विजय रहागंडाले यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नागपूर येथील कार्यालयात आयोजित आढावा बैठकित मांडली.

या आढावा बैठकीत तिरोडा तालुक्यातील चोरखमारा तलाव मुख्य गेटला गळती लागली त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.त्याचबरोबर संग्रामपूर तलावअंतर्गत नहर हे इंग्रजकालीन असल्याने त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.जेणेकरून शेवटच्या टोकापर्यंत शेतक-यांच्या शेतात तलावाचे पाणी जाईल.त्याचप्रमाणे खैरबंदा मध्यम प्रकल्पाच्या कालवा वितरण प्रणालीमध्ये अनेक वर्षापासून उपकालव्यांच्या तळाशी गाळ साचत असल्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे कालवा वितरण प्रणालीवर गाळ काढण्याचे व साफसफाईचे काम होणे अत्यावश्यक आहे.बोदलकसा तलावाअंतर्गत नवीन कामामध्ये धापेवाडा उपसा सिंचन टप्पा -२ अंतर्गत बोदलकसा तलावाच्या डाव्या मुख्य कालव्याचे नूतनीकरनाचे काम समाविष्ट करणे, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ अंतर्गत चोरखमारा तलावाच्या डाव्या कालव्यावरील निर्गमित लोणार वितरिका व त्यावरील लघु कालवा, उपलघु कालवा व चोरखमारा तलावाच्या मुख्य कालव्यावरील कोडेलोहारा वितरिकेवरून मुरपार लघु कालवा, नवरगाव लघु कालवा, इसापूर लघु कालवा, व त्यावरील लघु कालव्याचे नूतनीकरनाची कामे, बोदलकसा डावा कालव्यावरून निर्गमित बोदलकसा लघु कालवा व त्यावरील ठाणेगाव शाखा कालव्यावरून निर्गमित ठाणेगाव लघु कालव्याची दुरुस्ती करणे, भदभद्या लघु प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यांचे नूतणीकरण करणे, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ अंतर्गत चरण -३ करिता बोदलकसा तलावाच्या बुडीत क्षेत्रात बोदलकसा पंपगृहाचे बांधकाम सुरु करणे या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.