
गोंदिया,दि.२८ः-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन 17 मे च्या अनुषंगाने एनसीडी जनजागृती अभियानाचे आयोजन 17 मे 2025 ते दिनांक 16 जून 2025 पर्यंत संपूर्ण महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात बाबत केंद्र शासनाने कळविलेले आहे त्या अनुषंगाने केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि. 28 मे रोजी गोंदिया येथील सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयात आरोग्य शिबीर संपन्न झाले.
गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथील येथील सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयात 30 अधिकारी व कर्मचारी यांची रक्तदाब (बीपी) आणि रक्तातील साखर (ब्लड शुगर) यांची तपासणी सोबत हृदयरोग तपासणी, मधुमेह, दैनंदिन आरोग्य, व्यायाम,संतुलीत आहार व घ्यावयाची काळजी, वजन नियंत्रित ठेवणे इत्यादी विषयावर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आल्याची माहीती जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांनी या प्रसंगी दिली.
सद्य स्थितीत कार्यालयातील मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो.अनेकदा नऊ ते दहा तास काम करावे लागते.जागरण,अवेळी जेवण,अयोग्य जीवनशैली,असंतुलित आहार,व्यसन यामुळे अनेक व्याधी जडू शकतात. प्रत्येक कर्मचारी यांनी चाळिशीनंतर आपल्या आरोग्याचे सगळ्या चाचण्या नियमित वेळेत करणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
शिबिरात उपस्थित डॉ.सोनम जाधव यांनी नियमित बीपी व शुगरची तपासणी केल्यामुळे आपण असंसर्गजन्य रोगापासून कसे दूर राहू शकतो याबाबत मार्गदर्शन केले.तसेच विविध प्रकारच्या व्यायामांचे प्रात्यक्षिक देऊन उपस्थितांना शारीरिक तंदुरुस्ती कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले.विशेषतः जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी व्यायामाचे योगदान राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांनी स्पष्ट केले. ह्या वेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जनजागृती पोम्पलेट वाटप करुन जनजागृती करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या या आरोग्य शिबीरामुळे कर्मचारी यांना आपल्या आरोग्यप्रति जाण व जबाबदारीने काळजी घेण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे गोंदिया सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी टी.एच.ढमढेरे यांनी या प्रसंगी म्हटले आहे. आणि भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य लेखापाल जे.आर.बघेले व केटीएस रुग्णालयाचे डॉ.सोनम जाधव, आशा खरवडे ,निधी मिश्रा यांचे सहाय्य लाभले.