
हिवतापाकरिता अतिसंवेदशील 138 गावात प्रतीबंधात्मक कार्यवाही सुरु- डॉ.विनोद चव्हाण
गोंदिया,दि.३०ः जिल्हा हा किटकजन्य आजाराकरीता अतिसंवेदनशिल असुन जिल्हयात होणाऱ्या अनियमित पावसामूळे डास उत्पत्तीस पोषक वातावरण तयार होवून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याचे दिसून आले आहे.तसेच स्थलांतरीत होवून परत आलेल्या मजूरांमध्ये हिवतापाची लक्षणे आढळून येवून नंतर ते हिवताप दुषीत आढळून आल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील किटकजन्य आजार त्यात प्रामुख्याने हिवतापाकरिता मागील तीन वर्षाची आकडेवारी बघता सालेकसा,देवरी, मोरगाव अर्जूनी,सडक अर्जुनी हे चारही तालुके अति संवेदनशील असून त्यातील 138 गावावर पावसाळ्यापुर्वी प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग मिशन मोडवर काम सुरु केले असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.जिल्ह्यात सालेक्यात तालुक्यात सर्वाधिक 62 गावे,देवरी तालुक्यात 36 गावे,अर्जुनी मोरगाव तालुक्यात 25 गावे तर सडक अर्जुनी तालुक्यात 15 असे एकुण हिवतापाकरिता अतिसंवेदशील 138 गावावर पावसाळ्यापुर्वीच प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी या प्रसंगी दिली आहे. कार्यक्षेत्रातील आशा सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सहाय्यक यांचे पथक गावोगावी गृहभेटी करुन स्थलांतरीत होवून परत आलेल्या रुग्णांचे व गावातील संशयीत ताप रुग्णांचे रक्त नमूने,नियमित किटकशास्त्रीय सर्वेक्षण, तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये डी लार्वा टाकणे, कोरडा दिवस पाळणे, किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करणे व ग्रामपंचायत भेटी करुन मिशन मोडवर कार्यवाही सुरु केली आहे.
सालेकसा तालुक्यातील एकट्या प्राथमिक आरोग्य केंद दरेकसा अंतर्गत 44 गावांवर आरोग्य विभागाची करडी नजर राहणार असुन त्याची पावसाळ्यापुर्वी प्रतिबंधासाठी सुरुवात पिपरिया येथुन सुरु करण्यात आली आहे.सर्व गावात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक कार्यवाही करणार आहे.दि 23 मे रोजी दिवशी एकाच वेळेस 20 आशा सेविका,4 आरोग्य सेविका,5 आरोग्य सेवक व 3 आरोग्य सहायक यांच्या पथकामार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.त्यात 1103 आरडीके द्वारा 1440 लोकांचे हिवताप विषयक रक्त तपासणी करण्यात आली.साचलेल्या पाण्यात डीलार्वा मार्फत डास अळी नियत्रंण कार्यवाही करण्यात आली.कीटकजन्य आजार करिता सालेकसा व आमगाव तालुक्यातील दोन कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ नागपुरे व बिसेन यांच्या द्वारा डास संशोधन व जनजागरण करण्यात आले.
जिल्ह्यात हिवतापाकरिता अतीसंवेदनशील सर्व 138 गावांमध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन पुर्ण करण्यात आले असुन त्यावर प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक कार्यवाही तालुका आरोग्य अधिकारी,आरोग्य पर्यवेक्षक यांच्या देखरेखी खाली नियोजनबद्ध सुरु असल्याची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी विनोद चव्हाण यांनी याप्रसंगी दिली आहे. सालेकसा तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी,डॉ.प्रभाकर डोंगरवार यांच्या विशेष मार्गदर्शनात व हिवताप विभागाचे जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक नंदकिशोर भालेराव यांच्या नेतृत्वात ठाकूर, खापर्डे,गणवीर,दिपेश चौहान,देखमुख, दिपेवड, जायभाये,मसराम, व आरोग्य सेविका हेमलता फुंडे,सय्याम सोबत एम्बेड केंद्रसाशित एनजिओचे हिमानी यादव यांनी प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण केली.
पावसाळ्यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात कीटकजन्य व जलजन्य आजार नियत्रंण कार्यक्रम राबविण्याचे व त्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून नागरिकांनी,पदाधिकारी, समाजसेवी संघटना यांनी आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळुन आरोग्य विभागाच्या मिशन मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी याप्रसंगी केले आहे.