महावितरणचा 20 वा वर्धापन दिन ‘विद्युत सुरक्षेला’ समर्पित;1 ते 6 जून दरम्यान ‘सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन

0
95

नागपूरदि. 31 मे 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन महावितरणच्या स्थापनेला येत्या 6 जून रोजी 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या महत्त्वपूर्ण वर्धापन दिनाचे औचित्य साधून, 1 ते 6 जून 2025 हा आठवडा ‘शून्य अपघात महावितरण… शून्य अपघात महाराष्ट्र…’ या संकल्पनेवर आधारित “वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह” म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार आहे.

अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती

गेल्या काही वर्षांत महावितरणने कर्मचाऱ्यांच्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले असले तरी, नागरिक आणि लहान मुलांचे विद्युत अपघात वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, समाजात विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन: रविवार, 1 जून रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयांच्या मुख्यालय शहरांमध्ये ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
  • जनजागृतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताहाविषयी माहिती देण्यासाठी एसएमएस पाठवले जातील. तसेच, वीज ग्राहकांना विद्युत सुरक्षेविषयी ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल.
  • प्रत्यक्ष जनजागृती: सोमवार, 2 जून रोजी प्रत्येक उपविभागात किमान एका निवासी परिसरात विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती केली जाईल. बाजारांच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक केंद्रांवर आणि गर्दीच्या परिसरातही जनजागृतीवर भर दिला जाईल.
  • स्पर्धांचे आयोजन: विद्यार्थी, ग्राहक आणि जनमित्रांसाठी विद्युत सुरक्षेवर प्रश्नमंजुषा जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवार, 3 जून आणि बुधवार, 4 जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी, कुटुंबीयांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षेवर निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाईल. कर्मचाऱ्यांसाठी विद्युत सुरक्षा या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येईल.
  • पोस्टर्स आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रचार: महावितरण कार्यालये, रोहित्र पेट्या, आर.एम.यू., डिजिटल बोर्ड, शिडी गाड्या, उपकेंद्र, तक्रार निवारण केंद्रे, ग्राहक सुविधा केंद्रे आणि निवासी परिसरात विद्युत सुरक्षा पोस्टर्स लावले जातील. समाज माध्यमे, रेडिओ, टी.व्ही. आणि इतर प्रसारमाध्यमांद्वारेही विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती केली जाईल.
  • वसुंधरा दिनानिमित्त रॅली: गुरुवार, 5 जून रोजी वसुंधरा दिनाचे औचित्य साधून विभागीय स्तरावर विद्युत सुरक्षा व वीज बचत या विषयावर रॅली काढण्यात येईल.
  • वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व प्रतिज्ञा: शुक्रवार, 6 जून रोजी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एसएमएसद्वारे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातील, तसेच सर्व वीज ग्राहकांना विद्युत सुरक्षेबाबत एसएमएस पाठवले जातील. सकाळी सर्व शाखा कार्यालयांमधील जनमित्रांसाठी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकरीता मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी: कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी, कुटुंबीयांसाठी आणि शालेय विद्यार्थी, ग्राहक आणि जनमित्रांसाठी आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यांनी आपली नावे श्री कुणाल गजभिये, व्यवस्थापक (मानव संसाधन), नागपूर शहर मंडल, प्रकाश भवन, लिंक रोड, गड्डीगोदाम, सदर, नागपूर, ईमेल – [email protected] यांचेकडे सोमवार, दि. 2 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदवावीत

नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.