
चंद्रपूर : ओडीशा राज्यातून छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रातील गडचिरोलीत दाखल झालेले जंगली हत्तीच्या कळपातील दोन हत्ती भरकटून वैनगंगा नदीचे पात्र ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. दोन दिवसांपासून या हत्तींचा प्रवास सावली तालुक्यातून सिंदेवाही तालुक्यात झाला असून सध्या ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन ते कोअर झोन असा प्रवास सुरू असल्याने ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून लगतच्या गावकर्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या चमू तैनात करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातून वैनगंगा नदीचे पात्र पार करीत हे दोन हत्ती ३० मे रोजी ताडोबातील बफर क्षेत्र असलेल्या कुकरहेटी गावात दाखल झाले. तेव्हापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून या हत्तीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सदर हत्ती वनविभागाच्या वनकक्ष क्रमांक ८०८, २७० अ आणि २७० ब कंपार्टमेंटमधून जंगलाकडे निघाले. काही वेळाने ते नलेश्वर तलावात खेळू लागले. ३० तारखेच्या रात्रीपर्यंत त्यांच्या पावलांच्या ठशांवरून असे दिसून आले की ते कंपार्टमेंट क्रमांक ३१९ मार्गे (Tadoba Tiger Reserve) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनकडे जात आहेत.
या पथकांना नाईट व्हिजन उपकरणे, आयआर ड्रोन आणि हत्तींना हाकलण्यासाठी आवश्यक असलेले इतर साहित्य पुरवण्यात आले आहे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उंच ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. लोकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि कोणतीही समस्या आल्यास वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले जात आहे.