
गोंदिया, दि. 31 मे 2025: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी अंतर्गत आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप व “राघोजी भांगरे” गुणगौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन कक्षात मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय, माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा, बोरगाव येथे 1 मे ते 31 मे 2025 या कालावधीत उन्हाळी सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, मेहंदी, क्ले-आर्ट, पेंटिंग, संगीत, बांबू आर्ट, अॅथलेटिक्स यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना “राघोजी भांगरे” गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु. 10,000/-, रु. 7,000/- व रु. 5,000/- इतकी रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. 100 टक्के निकाल देणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार संजय पुराम (आमगाव-देवरी) यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीत आमदार राजकुमार बडोले (अर्जुनी-मोरगाव), जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी प्रास्ताविकात शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या बौद्धिक व नैतिक विकासाला चालना मिळावी, हा यामागील मुख्य हेतू आहे.” कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.