महावितरणच्या ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद;वीज सुरक्षेसाठी जनजागृती

0
19

 नागपूर,2 जून 2025: महाराष्ट्रात विजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी महावितरणने आपल्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘विद्युत सुरक्षा सप्ताहा’चा (1 ते 6 जून) प्रारंभ रविवारी (दि. 1 जून) ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनने केला. या मॅरेथॉनला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते विद्युत भवन येथे या मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना दोडके यांनी ‘महावितरणमध्ये शून्य अपघात, महाराष्ट्रात शून्य’ ही या सप्ताहाची संकल्पना असल्याचे सांगितले. नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दैनंदिन कामात सुरक्षिततेला महत्त्व देण्याबरोबरच कामाच्या ठिकाणी निरोगी वातावरणाची गरजही त्यांनी अधोरेखित केली. ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनच्या माध्यमातून महावितरणने विद्युत सुरक्षेच्या महत्त्वावर भर दिला असून, नागरिकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

या मॅरेथॉनमध्ये नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, चाचणी मंडलाचे अधीक्षक अभियंता वैभव पाटोडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी असे तब्बल 700 जण सहभागी झाले होते. विद्युत सुरक्षा विषयावरील घोषणा, माहितीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून यावेळी जनजागृती करण्यात आली.

2.5 किमी लांबीच्या या मॅरेथॉनचा समारोप प्रकाश भवन, गड्डीगोदाम येथे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे महत्त्व सांगतानाच त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सक्रिय प्रयत्नांचे कौतुक केले. या मॅरेथॉनने शारीरिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या जाणिवेला बळ तर दिलेच, पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील एकता आणि समर्पणाचाही अनुभव दिला, असे दोडके म्हणाले.

यावेळी संचालक, ग्राहक व्यवहार ॲड. गौरी चंद्रायण, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे आणि नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांच्यासह मॅरेथॉनमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, प्रकाश भवन येथे व्होकॉर्ट हॉस्पिटलच्या सहयोगाने आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते, जिथे सहभागींच्या रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासण्यात आली.

विविध जनजागृतीपर कार्यक्रम

‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन व्यतिरिक्त, विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक जनजागृती मोहीम, निबंध आणि चित्रकला स्पर्धा, सुरक्षा प्रश्नमंजुषा, पोस्टर अभियान आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (5 जून) रॅली यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्या आणि ग्राहकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे सुरक्षा संदेश पाठवले जात आहेत. शाखा कार्यालयांमध्ये सुरक्षा प्रतिज्ञा समारंभ आयोजित केले जात असून, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मनोरंजक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.