
नागपूर, 9 जून 2025: महावितरणच्या नागपूर परिमंडळाने ग्राहकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा देण्याच्या वचनबद्धतेत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. सावनेर विभागातील धापेवाडा उपकेंद्रानंतर आता बुटीबोरी विभागातील तब्बल चार 33/11 केव्ही उपकेंद्रांना एकाचवेळी आयएसओ 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे मानांकन प्राप्त झाले आहे. या यशामुळे महावितरणच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या मानांकनामुळे निलडोह, सोनेगाव, मोहगाव आणि डोंगरगाव या चारही उपकेंद्रांची गुणवत्ता व सेवा अधिकृतपणे प्रमाणित झाली आहे. 24×7 वीज वितरण, 33/11 केव्ही उपकेंद्रे, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या आणि वितरण रोहित्रांची देखभाल व संचालन या सेवांमध्ये आता आयएसओ मानकांचे पालन केले जाणार आहे. या उपकेंद्रांचे सक्षमीकरण आणि नूतनीकरण केल्यामुळे हे यश शक्य झाले आहे.
महावितरणसाठी ग्राहकांचे जीवनमान उंचावण्याच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेनुसार दर्जेदार वीजपुरवठा ही प्राथमिक जबाबदारी आहे. आयएसओ मानकांनुसार काम झाल्यामुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहेत. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी कर्मचाऱ्यांच्या स्वयंस्फूर्तीने केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक केले. तसेच इतर विभागांनाही प्रेरणा घेऊन आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
महावितरणच्या अलीकडेच पार पडलेल्या 20व्या वर्धापनदिन कार्यक्रमात या यशाचे शिल्पकार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत, सुप्रसिद्ध टीव्ही कलाकार अजित कोष्टी, संचालक (ग्राहक व्यवहार) ॲड. गौरी चंद्रायण यांच्या उपस्थितीत व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे उपस्थित होते.
बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे यांच्या नेतृत्वाखालील निलडोह, सोनेगाव, मोहगाव व डोंगरगाव उपकेंद्रातील अधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये एमआयडीसी-2 उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंते फिरोज कनोजे व पराग फाटे, सहायक अभियंते प्रणय काळे व शैलेश निमकर; हिंगणा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंते भूपेंद्र रंधे, कनिष्ठ अभियंता सुमित पिसे; बुटीबोरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंते प्रशांत चरपे, सहायक अभियंते मनोज पुरी तसेच यंत्रचालक प्रशांत ओसवाल, सारंग चापले, महेंद्र वेठी, गणेश शंभरकर, नितीन वैद्य, संजय सिरसाम, गोविंद मानेकर, निलेश जाधव, मनोज चौधरी, हरीश झिले, राहुल शेंडे, प्रजापती व नीता काकडे यांचा समावेश होता. बुटीबोरी विभागाचे अति. कार्यकारी अभियंते श्री. अशोक गाणार यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्या सततच्या पाठपुराव्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
धापेवाडा उपकेंद्रासाठी, ज्याला पूर्वीच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे, सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंते सुधीर हेडाऊ, अति. कार्यकारी अभियंते जयंत ठाकरे, कळमेश्वर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंते रोशन शेंद्रे, कनिष्ठ अभियंते रजत पवार व यंत्रचालक योगेश खिरडकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.