मोबाईल हिसकावल्याने जिल्हा नियोजन बैठकीत खासदार-पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची

0
203

भंडारा  : भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहावयास मिळाले. खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सोशल मिडिया हॅण्डलरचा मोबाईल हिसकाविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावरुन खा. डॉ. प्रशांत पडोळे व पालकमंत्री संजय सावकारे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती पुढे येत आहे. यावरुन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा झाल्याने काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दि. ८ जून २०२५ रोजी भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बेठकीला पालकमंत्री संजय सावकारे उपस्थित होते. काही विषयांना घेऊन खा. डॉ. प्रशांत पडोळे  व पालकमंत्री यांच्यात विकास निधीवरुन बाचाबाची होत असतांना खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सोशल मिडिया चालविणार्‍या हॅण्डरने व्हिडिओ घेतला. ही बाब पालकमंत्र्यांच्या लक्षात येताच सोशल मिडिया चालविणार्‍या हॅण्डरचा मोबाईल हिसकावून त्याला सभागृहाबाहेर पाठविले. यावेळी सभागृहात आमदार, खासदार व पालकमंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची खमंग चर्चा आता होऊ लागलेली आहे.

यावेळी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा मांडला. त्यावर शासकीय महाविद्यालयाचा कामाला गती देण्यासाठी लवकरच बैठक लावण्यात येईल, असे पालकमंत्री सावकारे यांनी सांगितले. जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान झालेल्या धानपिकाचे नुकसान व पंचनाम्याबाबत उपस्थित लोकप्रतिनिधींनी मुद्दा उपस्थित केला असता जिल्ह्यात सर्वसाधारण अकराशे हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली.

तसेच जिल्ह्यात २३६ धान खरेदी केंद्र सुरु असल्याची माहिती पणन विभागाने दिली. यावेळी तुमसर व मोहाडी येथील तालुका क्रिडांगणाचे काम तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री सावकारे यांनी दिल्यात. मात्र आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार व पालकमंत्र्यांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाची प्रकरणाची खमंग चर्चा केली जात आहे.