आता 1311 हेक्टरपर्यंत होणार सुरजागड लोहखाणीचा विस्तार

0
53

गडचिरोली : देशातील उच्च दर्जाचे लोहखनिज असलेल्या गडचिरोलीतील सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्यासाठी लॅायड्स मेटल्सला वाढीव 937 हेक्टरची लिज देण्यास पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने 1 लाख 24 हजार झाडांची कटाई केली जाणार आहे. दुसरीकडे लॅायड्स मेटल्सने ग्रिन गडचिरोलीचा संकल्प करत 30 लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

लॅायड्स मेटल्सला सुरजागड लोहखाणीसाठी आधी 374 हेक्टरचे क्षेत्र लिजवर मिळाले आहे. त्यापैकी 348 हेक्टर क्षेत्रावर कंपनीचे काम सुरू आहे. मात्र लोहखनिज प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने उत्खनन क्षमता 10 दशलक्ष टनावरून 26 दशलक्ष टनापर्यंत करण्यासाठी वाढीव 937 हेक्टर क्षेत्राची मागणी कंपनीने केली होती. त्यानुसार चार महिन्यांपूर्वी पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली. त्यात बाधित गावांमधील बहुतांश नागरिकांनी पर्यावरणविषयक आक्षेप, शंका घेतल्या नाही. कंपनीच्या वतीनेही इलेक्ट्रिक वाहने, स्लरी पाईपलाईनच्या माध्यमातून लोहखनिजाची वाहतूक होणार असल्याचे स्पष्ट केल्याने पर्यावरण विभागाने या वाढीव लिजला मंजुरी दिली. त्यामुळे आधीचे 374 हेक्टर आणि आताचे 937 हेक्टर अशा 1311 हेक्टर क्षेत्रातून आता लॅायड्सकडून लोहखनिज काढले जाणार आहे.विशेष म्हणजे या वाढीव क्षेत्रात पूर्णपणे जंगलच आहे. त्यामुळे या वाढीव लिजमुळे कोणत्याही गावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार नसल्याचे कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे.

वनविभागाचे ‘टार्गेट’ लॅायड्स पूर्ण करणार

गडचिरोली वनवृत्ताला यावर्षी 15 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने दिले आहे. दुसरीकडे लॅायड्स मेटल्सने ग्रिन गडचिरोली हा प्रकल्प हाती घेऊन जिल्ह्यात 30 लाख वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. त्यासाठी वनविभागाकडे कुठे-कुठे झाडे लावण्यासाठी जागा आहे याची माहितीसुद्धा लॅायड्सने वनविभागाकडे मागविली आहे. त्यामुळे वनविभागाचे 15 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट लॅायड्स मेटल्सकडून सहजपणे साध्य केले जाणार आहे.