
मानोरा व मंगरूळपीर तहसील कार्यालयात तक्रार निवारण दिनात विविध मुद्द्यांचा घेतला आढावा
वाशिम ,दि.१२ जुन -प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने मानोरा व मंगरूळपीर तहसील कार्यालयात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेत प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले.
यावेळी महसूल, पांदन रस्ते, फेरफार, भूसंपादन व सामाजिक योजनांवरील अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. देवरे यांनी सांगितले की, प्रशासन हे जनतेसाठी असून, प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने कार्य करत नागरिकांचे विश्वासार्ह प्रतिनिधी म्हणून वागले पाहिजे.
नागरिकांच्या विविध समस्या थेट प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी काही तक्रारी मांडल्या. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना श्री.देवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी पांदन रस्त्यांची स्थिती, महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी, प्रलंबित फेरफार प्रकरणे, शासकीय जमीन मोजणीची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणांची सद्यस्थिती, सातबारावर रस्ते नोंदणी , गाव नकाशे, गाव तिथे स्मशानभूमी, लोक सेवा हक्क अधिनियम, ईद पीक पाहणी, ईद चावडी, आदीवासी जमिन हस्तांतरण व वाटणी, सलोखा योजना, जीवंत सातबारा, तलाठी दप्तर तपासणी, कमीजास्त पत्रके, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्तीची प्रकरणे आदी बाबींचा आढावा घेतला. संबंधित विभाग अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही श्री.देवरे यांनी यावेळी दिले.
मानोरा येथील तक्रार निवारण दिनात तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरकाडे, ठाणेदार श्री.शिंदे, उपअधीक्षक श्री.आडे, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंगरूळपीर येथील तक्रार निवारण दिनामध्ये उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,तहसीलदार रवी राठोड, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी के.एन.साखरे आदींसह इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
दर गुरुवारी मानोरा व मंगरूळपीर येथे तक्रार निवारण दिन:
या उपक्रमामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक बळकट होण्यास मदत होणार असून नागरी सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.अश्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.