
सालेकसा-राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जुन महिन्यात दि.1 ते 30 जुन हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो.या महिन्यादरम्यान, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि मेंदूज्वर यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहिम आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जातात. या अनुषंगाने हिवताप व इतर कीटकजन्य आजाराविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत असते तसेच हिवताप,डेंग्यु व इतर कीटकजन्य आजाराबाबत कार्यशाळेतुन विविध अद्यावत प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा आयोजन केले जात असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.
दि.25 जुन रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सालेकसा येथे पावसाळा पूर्व किटकजन्य आजार नियंत्रण, जलजन्य आजार व उपाययोजनासंबंधी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण व सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी सालेकसा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक उपस्थित होते. हिवताप कार्यशाळेत हिवताप विभागाचे कीटकशास्त्रज्ञ अनिल चोरवाडे, नागपुरे,बिसेन जिल्हास्तरीय पर्यवेक्षक किशोर भालेराव व ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीचे उपाययोजना,मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना,हिवताप प्रतिबंधात्मक उपाय जसे गप्पी मासे,नवीन आणि उपचारांच्या पद्धती विषयी मार्गदर्शन, डासअळी नाशक पद्धती,अँबेट सोडणे,संडास-बाथरुम च्या पाईपला व्हेंट जाळी बसविणे, मच्छरदाणीचा वापर,गुणवत्तापुर्ण फवारणी,नियमित गृहभेटी दरम्यान करावयाचे कामे,विविध विभागांचा हिवताप कमी करण्याची जबाबदारी कीटकजन्य आजारासंबंधी माहिती व कीटकजन्य आजारावर शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हिवताप कार्यशाळेत तालुका कीटकशास्त्रज्ञ नागपुरे यांनी हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र,पाण्यात डासांची होणारी वाढ,डासामध्ये प्लासमोडीयम जंतुची वाढ व हिवताप जंतु भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढ्ळणारे बदल,किटकशास्त्रीय सर्वेक्षण,हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याची विस्तृत माहीती उपस्थितांना दिली.हिवताप कार्यशाळा यशस्वीतेसाठी तिरोडा तालुका आरोग्य सहाय्यक सेलोकर यांनी विशेष प्रयत्न केले.