तिरोड्यातील भूमिगत गटार योजनेच्या कामाची पहिल्याच पावसात पोलखोल

0
15

खड्डामध्ये फसू लागली वाहने,नागरिकांना त्रास

चित्रा कापसे/तिरोडा,दि.३०ः कोट्यावधी रुपयांच्या खर्चाने तिरोडा शहरातील गटार लाईन योजनेचे काम सुरू आहे.परंतु पहिल्याच पावसामध्ये शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे तयार झाले. संपूर्ण शहर चिखलमय झालेला असून जागोजागी पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी गटारलाईनच्या नाल्यामध्ये चारचाकी व दुचाकी वाहने फसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.गटार योजनेचे कंत्राटदार कंपनीच्या मनमानी व बेजबाबदारपणामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

तिरोडा शहरात गटर लाईन टाकण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवर खोलखोल खड्डे केले. त्यानंतर त्यामध्ये पाईप टाकून माती भरण्यात आली. मात्र, रस्ता सुरळीत करण्याचे काम अर्धवट सोडण्यात आले. काही ठिकाणी माती टाकली गेली असली तर, रोलर चालवला नाही. परिणामी संपूर्ण शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्याच्या पहिल्या पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोहनलाल चौक,साईकाॅलोनी, आगाशे लेआउट,साई मंदिर, किल्ला वार्ड ,ठाकूर मोहल्ला ,जुनी वस्ती, सहकार नगर या ठिकाणी टेम्पो टॅक्सी कार ट्रॅक्टर्स फसल्याने जनजीवन विस्कळीत झाले व अपघातांची शक्यता वाढली आहे. दुचाकीस्वार घसरून पडत असून, काही ठिकाणी वाहने खड्ड्यांमध्ये अडकले आहेत. नागरिकांनी याला थेट ठेकेदार कंपनीची निष्काळजीपणा जबाबदार धरला आहे. या कामादरम्यान अनेक ठिकाणी अंडरग्राउंड केबल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. विद्युत वाहिन्या, स्ट्रीट लाईट्सच्या केबल्स यांचे नुकसान झाल्यामुळे शहरातील विविध भागांत स्ट्रीट लाईट्स बंद आहेत. पावसाळा सुरू होताच गटर लाईन प्रकल्पातील अर्धवट कामामुळे नागरिकांची हालअपेष्टा वाढल्या आहेत. रस्त्यांवर साचलेले पाणी, कीचड व उघडी माती यामुळे शहरातील अनेक भागांतून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रशासनाकडे ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.