तपासणीआड कृषी केंद्र व्यवसायीकांकडून वसुली

0
61

प्रभारी कृषी विकास अधिकाऱ्याची सीईओंकडे तक्रार

गोंदिया ः कृषी सेवा केंद्राच्या तपासणीआड प्रभारी कृषी विकास अधिकाऱ्याने कृषी व्यवसायीकांकडून वसुलीचा प्रयत्न केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवसायीकांनी याप्रकरणी जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे व त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत कारवाईचे निर्देश दिले आहे.

जिल्ह्यात खरिपाच्या तोंडावर खताची साठेबाजी होत असून, शेतकऱ्यांवर वाढीव दराने खत खरेदीची वेळ आली आहे. याविषयी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी प्रमोद कागदीमेश्राम यांना काही कृषी सेवा केंद्राची तपासणी करा, अशी सूचना केली. परंतु, नव्या शासन आदेशानुसार कृषी विकास अधिकाऱ्यांचे तपासणीचे अधिकार काढल्याचे सांगत हे काम करण्यास कागदीमेश्राम यांनी नकार दिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच ते आमगाव येथील जय भवानी कृषी सेवा केंद्र व त्यानंतर कट्टीपार येथील कृषी सेवा केंद्राची तपासणी करून पैशाची मागणी करीत असल्याचे व्यवसायीकांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष हर्षे यांना कळविले. त्यानंतर गोरेगाव तालुक्‍यातूनही कागदीमेश्राम यांनी पैशाची मागणी केल्याबाबत व्यवसायीकांनी माहिती दिली. यावेळी भ्रमणध्वनीवरून कागदीमेश्राम यांच्याशी उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी संवाद साधला असता त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली. मात्र, हर्षे यांनी ही बाब गांभीर्याने घेत थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांना याबाबत माहिती देत कागदीमेश्राम यांच्यावर कारवाईची सूचना केली. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे आैत्सुक्याचे आहे.

प्रभारी कृषी विकास अधिकारी कागदीमेश्राम हे तपासणीआड पैशाची मागणी करीत असल्याच्या अनेक तक्रारी कृषी व्यवसायीकांनी केल्या. त्यामुळे त्यांचा पदभार काढावा, अशी शिफारस सीईओंकडे केली आहे.

-सुरेश हर्षे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया