
स्थानिक पातळीवर जनतेची कामे मार्गी लागण्यासाठी गाव पातळीवरील विविध कार्यालयांनी घेतली गती*
गावातील नागरिकांसमवेत संवादावर भर
नागपूर,दि.4: सर्वसामान्य लोकांना स्थानिक पातळीशी निगडीत असलेल्या अडचणींवर गावातच मात करता यावी, त्यांच्या अडचणी गावपातळीवरच निकाली निघाव्यात यासाठी गाव पातळीवरील कार्यालयांनी गती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दररोज झालेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने निश्चित केल्या प्रमाणे पहिला बुधवार व इतर दिवशी ग्रामपंचायत व तलाठी साजा कार्यालयात संबंधित अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष हजर राहून लोकांच्या तक्रारी मार्गी लावत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज मौदा तालुक्यातील पावडदौना, कामठी तालुक्यातील गुमथळा व इतर गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून समाधान केले.
*पंधरा दिवसात अर्ज निघतील निकाली*
तुमचे प्रश्न गावातच निकाली निघावेत यासाठी अनेक उपक्रमासमवेत समाधान दिवस हा आपण सुरु केला आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी प्रत्येक गावातील संबंधित अधिकारी हे गावातच उपलब्ध असल्याने त्या अर्जाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल. पहिल्या बुधवारी आलेल्या अर्जाचा निपटारा हा तिसऱ्या बुधवारी म्हणजेच पंधरा दिवसाच्या कालावधीत मार्गी लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुमथळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बैठकीत सांगितले. या बैठकीस सरपंच शिलाताई वांगे, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, तहसीलदार दत्तात्रय निबांळकर, मंडळ अधिकारी राहूल भुजाडे, तलाठी प्रतिक्षा पाटील, ग्रामसेवक अंकिता चकोले आदी उपस्थित होते.
*खोट्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत*
समाधान दिवसाच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्रशासनाला अधिक कर्तव्य तत्पर व गतिमान केले जात आहे. यात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. तथापी काही गावांमध्ये जाणीवपूर्वक ब्लॉकमेल करण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
पावडदौना येथे आयोजित समाधान दिवसात दहा तक्रारी प्राप्त झाल्या. यात आठ महसूल व दोन कृषी विभागाशी निगडीत आहेत. त्याचे निराकरण केल्या जात आहे. समाधान दिवसाच्यानिमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबीराचेही आयोजित करण्यात आले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.