सेजगाव ग्राम पंचायतीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देवून सन्मान

0
106

गोंदिया : ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ग्राम पंचायतींना आयएसओ मानांकन दिले जाते. यात सेजगाव ग्राम पंचायतीने बाजी मारली असून आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. नुकतेच प्रमाणपत्र देवून सेजगाव ग्राम पंचायतीचा सन्मान करण्यात आला.
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पंचायत राज संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागाअंतर्गत आवश्यक असलेले दाखले मिळण्यासाठी ई-पंचायत प्रकल्प राबवण्यात येत आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ग्राम पंचायतींमधील कागदपत्रांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे आयएसओ प्रमाणीकरण करून घेतले जात आहे. आयएसओ मानांकन घेण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा वापर करावा याचे वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार राज्य आणि जिल्हा पातळीवर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे मूल्यमापन करून त्यांना मानांकन देण्यात येणार आहे. यानुसार सेजगाव ग्राम पंचायतीने शासनाने दिलेल्या निकषानुसार कामगिरी करून उत्तम ठरली आहे.
वैयक्तिक – सार्वजनिक शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र वा राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचतगट, प्लास्टिक वापर बंदी, ग्रामपंचायतीच्या घरपट्टी वा पाणीपट्टी वसुली आदिमध्येही सेजगाव ग्राम पंचायतीने दमदार कामगिरी करीत नाव लौकिक केले आहे. या कामगिरीची दखल घेत सेजगाव ग्राम पंचायतीला आयएसओ मानांकन देण्यात आले आहे. नुकतेच सरपंच सौ.उषा कठाणे, उपसरपंच टेकचंदउ बिसेन यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्विकारले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य टी.एल.पारधी, गौरीशंकर पारधी, ग्रा.पं.अधिकारी अतुल ठाकरे, भिकराम रहांगडाले, तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते.