
गोंदिया,दि.०४ः ग्रामविकासाची सर्वांगीण व शाश्वत अशी विकासाची संकल्पना जी संयुक्त राष्ट्राने प्रस्तावित केली आहे,ती संकल्पना आपल्या अडीच वर्षाच्या ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदावर राहून सरपंच व इतर सदस्यांच्या मनात उतरवण्याचे सातत्याने प्रयत्न करुनही त्यात असमर्थ ठरल्याने सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक एड.लखनसिंह कटरे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वासह उपसरपंचपदाचा राजीनामा १ जुर्ले रोजी ग्रामपंचायत सरपंचाना सादर केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार ग्रामपंचायत मधील वार्ड क्रं.३ मधून सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक राहिलेले एड.लखनसिंह कटरे यांनी निवडणूक लढली होती.निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर उपसरपंच पद ही मिळाले.आपण आपल्या गावाचा सर्वांगीण विकासाच्या ध्यास मनात घेत ग्रामपंचायततमधील प्रशासकीय कामकाजात विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन पाऊल ठेवले होते.परंतु आपल्या अडीच वर्षाच्या काळात सरपंच व सदस्यांकडून त्याकरीता पाहिजे तसे सहकार्य न मिळाल्याने प्रशंसनीय व डोळ्यात भरण्यालायक असे कार्य आपणास करता आले नाही,ही बाब स्विकारत आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वासह उपसरपंच पदाचा राजीनामा एड.कटरे यांनी दिला.त्यांच्या या राजीनाम्याने ग्रामपंचायत प्रशासनात चांगले व्यक्ति जे शाश्वत विकासाची कास मनात घेऊन जाण्याची इच्छा ठेवतात अशा नागरिकांसमोर एक प्रश्न उभा ठाकला आहे.