आझाद हिंद एक्सप्रेसच्या चाकातून निघाला धूर; प्रवाशांत तारांबळ

0
974

गोंदिया : रायपूरकडून – नागपूरकडे जाणाऱ्या आझाद हिंद रेल्वेगाडीच्या चाकातून अचानक धूर निघू लागले. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच एकच तारांबळ उडाली. त्याचबरोबर गंगाझरी रेल्वे स्टेशन जवळ असल्याने यंत्रणाही सतर्क झाली. आझाद हिंद एक्स्रपेसला गंगाझरीत थांबविण्यात आली. दरम्यान गाडीबाहेर पडण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच धावपळ सुटली. यांत्रिकी विभागाने धूर निघत असलेल्या गाडीची पाहणी केली असता ब्रेक लाईनच्या घसरणामुळे धुर निघत असल्याचे समोर आले. यामुळे काही काळ थांबलेला प्रवास पुन्हा सुरू झाला. ही घटना (ता. ६) दुपारी ३ ते ४ वाजता सुमारासची आहे.
गाडी क्र. १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस नेहमीप्रमाणे गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहोचली. ठराविक वेळेनुसार नागपूरच्या प्रवासासाठी फलाट क्र. ३ वरून रवाना झाली. अवघ्या १५ किमी अंतराचा प्रवास दरम्यान धावत्या रेल्वेगाडीच्या चाकातून धुर निघताना दिसून आले. ही बाब काही प्रवाशांच्या निदर्शनास आली. धुर वाढत चालल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे गार्ड व पायलट देण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही अंतरावर असलेल्या गंगाझरी रेल्वे स्थानकाला याची माहिती देवून सतर्क राहण्याच्या सुचना
देण्यात आल्या. रेल्वेगाडी पोहोचताच रेल्वे प्रशासन स्थानकावर सज्ज झाले. तर दुसरीकडे रेल्वेगाडीतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची मोठी घाईगर्दी दिसून आली. पाहता-पाहता आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करणारे सर्व प्रवासी बाहेर पडले. त्यातच रेल्वे प्रशासनाने देखील धुर निघत असलेल्या डब्ब्यांची तपासणी करणे सुरू केले. दरम्यान एका डब्ब्याच्या ब्रेक लाईनरमधून होत असलेले घर्षनामुळे धूर निघत असल्याचे समोर आले. यामुळे रेल्वे प्रशासनासह प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. तुर्त यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून समस्या मार्गी लावण्यात आली. यानंतर आझाद हिंद एक्सप्रेसचा पुढील प्रवास सुरळीत झाला. जवळपास २० ते २५ मिनिटे रेल्वेगाडीतून निघत असलेला धूर आणि भितीपूर्ण वातावरणातून निर्माण झालेला थरार सर्वांनी अनुभवला.