
गडचिरोली दि. 16 –जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत परशुराम कुत्तरमारे (४२) यांना महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला.
२१ आॅक्टोबर रोजी अल्लापल्ली (ता. मुलचेरा) येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी कुत्तरमारे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ व अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(१)(१२) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. कुत्तरमारे यांनी याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सुरुवातीला गडचिरोली सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २० आॅक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास कुत्तरमारे प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा घेण्यासाठी गेले होते. केंद्रात १५ पैकी ४ कर्मचारी गैरहजर होते. कुत्तरमारे हे फिर्यादीला यावर स्पष्टीकरण सादर करण्यास सांगून निघून गेले. यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कुत्तरमारे यांनी फिर्यादीच्या मोबाईलवर कॉल करून आक्षेपार्ह विचारपूस केली. फिर्यादीने आधी जिल्हाधिकाऱ्यांना आपबिती सांगितली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. कुत्तरमारे यांच्यातर्फे अॅड. संग्राम सिरपूरकर यांनी बाजू मांडली.