
गडचिरोली, दि.२८: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील येरमागड येथील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर आज प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत आणखी चार विद्यार्थ्यांना डोकेदुखीने ग्रासल्याचे निदर्शनास आले, तर काल गडचिरोलीला रेफर करण्यात आलेल्या आशिक हिडामी या विद्यार्थ्याने एकाच दिवशी दीड किलो शेंगदाणे खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचेही तपासणीत निष्पन्न झाले आहे.
सोमवारी येरमागडच्या आश्रमशाळेत आठव्या वर्गात शिकणारा राजमू बुधकर धुर्वे(१४) रा.कटेझरी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अलीराम जयराम तुमरेटी यास गडचिरोलीला हलविण्यात आले होते. त्याला सर्पदंश झाल्याचे निदान झाल्यानंतर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला अँटीडोज देऊन नागपूरला हलविले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पुन्हा आशिक हिडामी या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्यालाही काल(ता.२७) गडचिरोलीला आणण्यात आले. या सर्व प्रकारानंतर आज आदिवासी विकास विभागाचे गडचिरोली येथील प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येरमागड आश्रमशाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. या तपासणीत ममिता माधव होळी, अशवंती मधुकर पोरेटी, करिना आनंदराव मडकाम व रुपाली यशवंत कुमरे या चार विद्यार्थ्यांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, काल गडचिरोलीला रेफर करण्यात आलेला विद्यार्थी आशिक हिडामी याने एकाच दिवशी तब्बल दीड किलो शेंगदाणे खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली, असे तपासणीत कळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.