
भंडारा,दि.29-berartimes.com : दामदुप्पट करून देण्याच्या नावावर जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांची लक्षावधी रुपयांनी फसवणूक केली. यात कंपनीच्या संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हीत संरक्षण कायदा १९९९ नुसार कारवाई करून रक्कम परत मिळवून द्यावी, यासाठी बुधवारला गुंतवणूकदार चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधित कंपनीचे संचालक संध्या ईश्वर आंबेडारे, विजयालक्ष्मी जगमोहन कठैत, दिनेश हेमराज टेंभरे, पार्थ सारथी डे, रज्जत सुरोड डे, अमित चौधरी व जमीन खरेदीदार रवी देवेंद्र परतवार यांच्या विरुद्ध कारवाई करून गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया लिमिटेड नावाची कंपनी उपरोक्त संचालकांनी सुरु केली. त्याचे कार्यालय प्रत्येक ठिकाणी सुरु करण्यात आले. यात गुंतवणुकदारांना प्रलोभन देऊन दामदुप्पट करून देण्याचे सांगण्यात आले. यातच त्यांची फसवणूक झाली. रक्कम मिळावी व गैरअर्जदारांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी लोकशाही मार्गाने मागणी केली. यात ६ सप्टेंबर २0१६ रोजी गैरअर्जदारांविरुद्ध भादंविच्या ४२0, ४0९, ४६७, ४६८/३४ तसेच कलम ४, ५, ६, ७६, १, २, ३ नुसार भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंगलाई येथील गट क्रमांक ६0९/९ आराजी ३१५२.४४ चौरस मिटर जागा आंबेडारे यांनी रवी परतवार यांना २ कोटी १0 लाखात विक्री केली. यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर सदर जमिनीची रक्कम ९0 लक्ष रुपये गैरअर्जदारांनी हडप केले असून १ कोटी १0 लाख रुपये खरेदीदारांकडे उर्वरीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा १९९९ नुसार अधिकार प्रदान नुसार चिटफंड करून फसवणूक करणार्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी आहे. यात कंपनीच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करून गुंतवणूकदारांची रक्कम परत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
आज दुपारच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोणारे यांच्या नेतृत्वात अनेक गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव केला. यावेळी महिलांची उपस्थिती मोठय़ा प्रमाणात होती. कन्हैया नागपुरे, शामलाल काळे, वंदना ठाकरे, रमेश बोंदरे, नामदेव तिजारे, मधुकर येरपुडे, विक्रांत तिडके, चंद्रभान कोडवते, गिरीधर गभणे, भगवान खंडाईत, गोपाल बसेशंकर, यशवंत खंडाईत, अरविंद शेंडे, ज्ञानेश्वर गजभिये, वनिता चवरे, कल्पना जावळकर, विद्या भांबोरे यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांच्या निवेदनात स्वाक्षर्या आहेत.