नागपूर- महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षांच्या निमित्ताने सत्यशोधक समाजाच्या वतीने, दिनांक ११एप्रिल २०२६ ला सेवादल महिला महिला महाविद्यालय सक्करदरा चौक नागपूर येथे महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती प्रित्यर्थ सत्यशोधक विवाह पद्धती या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. संजय शेंडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा प्रतिमा परदेशी, पुणे , प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
‘सत्यशोधक विवाह पद्धती ‘ ही सर्व जाती धर्माच्या लोकांना अनुसरता येईल अशी वैशिष्ट्यपूर्ण लग्नपद्धती असून, एकाच जातीचे, धर्माचे असो अथवा दोन जातीचे, धर्माचे मुलगी मुलगा असो सर्वांना या पद्धतीने लग्न लावता येते. विधीकर्ता विशिष्ट जातीचा असण्याची गरज नाही. आपल्या कुटुंबातील किंवा मित्रमंडळी पैकी कोणीही शिकलेले स्त्री पुरुष सत्यशोधक पद्धतीने लग्न विधी पार पाडू शकतात. या विवाहात आपल्याला दुय्यम लेखणारे, आपल्याविषयी अपमानजनक मजकूर असलेले, आपल्याला न समजणारे मंत्र, तंत्र, कर्मकांड असलेले विधी राहत नाही. आपला उज्ज्वल सांस्कृतिक वारसा असलेल्या बळीराजा, निॠती, खंडोबा, जोतिबा, म्हसोबा, पासून अलिकडच्या काळात आपले जीवन फुलवणारे संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ.पंजाबराव देशमुख इत्यादी महान समतावादी, न्याय वादी वारश्याची आठवण करून , उपस्थित सर्व सत्यजनांच्या साक्षीने सत्यशोधक विचाराने जगण्याची, एकमेकांचा आदर करण्याची शपथ घेऊन हा विवाह संपन्न होतो. शेतीच्या धान्यावर जगातील सर्वांचं भरन पोषण होते. त्यामुळे धान्य, जमीन आणि पाणी यांचं आपल्या सर्वांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन सत्यशोधक विवाहात धान्य, जमीन आणि पाणी यांची निसर्गातील फुले पाने वाहून पुजा केली जाते. जलपुजन केले जाते. निसर्गाला वंदन केले जाते. वंदन गीत साध्या चालीवर म्हटले जाते.
आपले पोषणकर्ते वधुवरांचे आईवडील, मामा मामी यांना देखील वधुवर वंदन करतात. त्यांनी स्वतः कष्ट करून शिकवले, सक्षम केले याविषयीची कृतज्ञता म्हणून त्यांना वंदन केले जाते. त्यांचा आदर केला जातो. आदर व्यक्त करणारी ओवी म्हटली जाते. या विवाहात सुरुवातीला महात्मा फुले यांचा सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर हा अखंड गायला जातो, तसेच शेवटी स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे , हा स्त्री पुरुष समता आणि श्रमप्रतिष्ठेचे मूल्य जपणारा अखंड गायला जातो. शेवटी उपस्थित सत्यजन मित्रमंडळी आप्तेष्ट वधुवरांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात. टाळ्यांचा गजर करतात.सर्वजण आशीर्वाद आणि सदिच्छा देतात. अशाप्रकारे सत्यशोधक पद्धतीत आनंददायी वातावरणात लग्नसोहळा पार पडतो. अशी सविस्तर सत्यशोधक लग्नपद्धती प्रा. प्रतिमा परदेशी यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केली. त्यासोबतच प्रचलित विवाह पद्धतीमध्ये असलेल्या उणिवांचा देखील त्यांनी आढावा घेतला. आपल्यावर विषमता लादणारे, आपली अवहेलना करणारे, आपल्याला निच मानणारे लेखन असलेले मंत्र आणि कर्मकांड आपल्या हिताचे असू शकत नाही. आपलं अहितच त्यामाध्यमातून केलं जाते. ते समजू नये म्हणूनच मनुस्मृती आणि इतर धर्मग्रंथांनी स्त्रीशुद्रातिशुद्र अर्थात ओबीसी, दलित आदिवासी आणि सर्व स्त्रीयांवर शिक्षणाची बंदी लादली. धर्माच्या नावाने चालवलेली लुबाडणूक कळावी,आपण स्वतंत्र पणाने विचार करावा, यासाठीच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण बंदी झुगारुन स्त्रीशुद्रातिशुद्रांसाठी शाळा सुरू केल्या. आपल्या अस्सल सांस्कृतिक वारसा उजागर करण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली. सत्यशोधक मंगलाष्टका पुजा विधी तयार केला. सत्यशोधक चळवळीत पुढे स्वयंपुरोहित सारखी पुस्तके लिहिली गेली.
लग्नसंस्कार हा केवळ वधुवरांसाठीच महत्त्वाचा नसतो तर दोन कुटुंबांना, दोन भौगोलिक भागांना एकत्र येऊन वाटचाल करण्याचा संस्कार आहे. एकमेकांना साथ देण्याचा तसेच आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना शिक्षित करून त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी झिजण्याचा संकल्प करण्याचा संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. शिकलेल्या बंधुभगिनींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला म्हणून आपल्यापैकी अनेकांना चांगले शिकण्याची संधी मिळाली,नोकऱ्या लागल्या. चांगले जीवन आपल्या वाट्याला आले. परत आपल्यावर बंदी लादणाऱ्या, शिक्षण नाकारणाऱ्या धर्माची री ओढत असू तर आपल्यासाठी झिजलेल्या महामानवांच्या आणि आपल्या स्वतःच्या प्रति देखील कृतघ्नपणानं वागणे ठरेल याची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा पाया ज्यांनी घातला, त्यांनी काय लिहून ठेवले, हे तरी किमान वाचले पाहिजे.
विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात उभे रहायचे असेल तर विषमतावाद्यांचे धर्मसंस्कार देखील नाकारले पाहिजे. आणि बळीराजा पासून चालत आलेले समता , स्वातंत्र्य आणि समृद्धीचे संस्कार आजच्या काळाशी अनुरूप बदल करण्याचे स्वातंत्र्य वापरून हा सत्यशोधक विवाह संस्कार काळाच्या कसोटीवर उतरत आहे. म्हणून सत्यशोधक विवाह पद्धती सोप्या व सुटसुटीत आनंददायी पद्धतीने पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त करून उपस्थितांनी सत्यशोधक विवाह विधीकर्ते बणून जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. कार्यशाळेत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उकल देखील यावेळी करण्यात आली.
कार्यशाळेला सत्यशोधक समाजासह विद्रोही सांस्कृतिक चळवळ, नवउन्मेशन साहित्य सभा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बहुजन सौरभ गृप व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सुधाताई बामनपल्लीवार, विजय बाभुळकर, बाबा बीडकर, संध्या राजुरकर, विनोद उलिपवार, टेमराज माले, संजय नरखेडकर, अनुज हुलके, वंदना वनकर,राजु बोचरे, सुनिल जुमडे,रमेश सोनवणे, सुरेश मानमोडे, सुरेश कुथे, विलास गजभिये, रंजना कोल्हे, चित्रा जुमडे,अनिल दिवान, रवींद्र राऊत, श्रीराम प्रसाद, ज्ञानेश्वर लांजेवार, अमित लांजेवार, शंकर ढबाले, बाबा सावरकर, शंकर गंधारे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.





