तिरोडा,दि.18 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यावर्षी डिसेंबर अखरेपर्यंत गोंदिया जिल्हा हागणदारीमुक्त करावयाचा आहे. त्यासाठी पंचायत समिती व जिल्हास्तरावर बैठका घेतल्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ.सी.एल. पुलकुंडवार थेट ग्रामपंचायतीत आकस्मिक भेट देवून वैयक्तिक शौचालयांची पाहणी करीत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे. स्वच्छ भारत मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमात हयगय करणार्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी तिरोडा तालुक्यातील मेंढा व ठाणेगाव येथे आकस्मिक भेटी दिल्या. या वेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून वैयक्तीक शौचालयांची देखील पाहणी केली. भेटीदरम्यान तिरोडा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी रोशन दुबे, विस्तार अधिकारी एस.एस. निमजे उपस्थित होते.राज्य शासनातर्फे यावर्षी राज्यातील १0 जिल्हे मिळून हागणदारीमुक्त करावयाचे आहेत. त्यात गोंदिया जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या आठही पंचायत समितीस्तरावर जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या बैठकांमध्ये ग्रामसेवकांनी स्वत: वैयक्तीक शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी सांगितला आहे. ग्रामसेवकांनी सांगितलेल्या कालावधीत वैयक्ती शौचालयांचे बांधकाम करण्याचे व गाव हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी बैठकांत दिले होते. त्यानंतर आता प्रत्येक तालुक्यात आकस्मिक भेटी देवून ग्रामसेवकांनी दिलेल्या कालावधीत बांधकाम पूर्ण केले अथवा नाही, याची पाहणी करण्यात येत आहे. भेटीदरम्यान स्वच्छ भारत मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमात हयगय केल्याचे आढळल्यास तथा त्यामुळे राज्यात जिल्हा मागे पडल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा सुतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी केला आहे.