
गोंदिया,दि.21- जिल्ह्याच्या अर्जुनी तालुक्यातील कऱ्हांडली गावात वाघाची दहशत पसरल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल मध्यरात्री एका वाघाने कऱ्हांडली गावातील पंढरी जांभुळकर यांच्या गोठ्यात शिरून एका शेळीची शिकार करत शेळीला ठार केले. सकाळी पंढरी आपल्या शेळ्या आणि जनावरांना गोठ्यातून बाहेर काढण्यासाठी रोजच्या प्रमाणे गोठ्या गेले असता शेळीवर वाघाने हल्ला केल्याचे लक्षात येताच पंढरी यांनी याची माहिती गोठणगाव वनपरिक्षेत्र अधिकारि राहगडाले यांना दिली. वन अधिकाऱ्यांनी घटना स्थळाची पाहणी केली असता गोठ्यात आणि पंढरी जांभुळकर यांच्या अंगणात तसेच मागच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कऱ्हांडली हे गाव नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने या गावाच्या सोभवताल वन्य प्राणी नेहमीच फिरकत असतात. त्यामुळे वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून गावकऱ्यांची भीती दूर करावी अशी मागणी कऱ्हांडली वासियांनी केली आहे. वन अधिकाऱ्यांनी पंढरी यांच्या शेळीचा पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाई देण्याकरीता प्रस्ताव पाठवला आहे.