किर्तनकार पोचविणार ओबीसी महामोर्च्याची माहिती गावखेड्यात

0
11

गोंदिया,दि.21 : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्वस्तरीय कलाकार, शाहीर, किर्तनकार, प्रवचनकार व गोंधळी यांची बैठक हभप नानीकराम टेंभरे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज २१ नोव्हेंबरला ओबीसी संघर्ष कृती समितीच्या जयस्तंभ चौक येथील स्वास्तीक ब्रिक्स या कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीमध्ये दोन्ही जिल्ह्यातील ओबीसीमध्ये येणारे सर्व किर्तनकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीला गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे ,महासचिव मनोज मेढे शिशिर कटरे,मार्गदर्शक खेमेंद्र कटरे ,प्रा संजिव रहागडाले, उपाध्यक्ष कैलास भेलावे, भुवन रिनाईत,चंद्रकुमार बहेकार,जगन्नाथ पारधी, जीवनलाल बोपचे, राधेश्याम पटले, मटाले महाराज, बानक महाराज व रुखमलाल महाराज आदी उपस्थित होते.यावेळी टेंभरे यांनी किर्तनकारांना संघटित करुन जिल्हास्तरावर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटन तयार करण्यासंबधी माहिती दिली.तसेच आपण ओबीसी समाजामध्येच येत असल्याने आपल्या समाजाला सवैधानिक अधिकाराची जाणिव करुन देण्यासाठी आपण जे किर्तनाच्या माध्यमातून आधीपासूनच जनजागृतीचे काम करीत आहोत,त्यातच ओबीसीना राज्यघटनेत असलेले अधिकार व त्यांची माहिती देण्यासाठी ओबीसी समिती काढत असलेल्या जनजागृती अभियानात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी उपस्थित किर्तनकारांना मनोज मेंढे यांनी प्रास्तवनेच्या माध्यमातून ओबीसी संघर्ष कृती समितीची माहिती दिली.तसेच 8 डिसेंबरच्या महामोर्च्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.तर जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी ओबीसी समाजावर आजपर्यंत झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती देत राज्यघटनेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कशाप्रकारे ओबीसींना न्याय मिळवून दिला आहे ते सांगितले.स्वांतत्र्यानंतरही आपल्या समाजाला ते हक्क प्राप्त न झाल्याने ते मिळवून घेण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून गावखेड्यात जनजागृती करुन मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.