25.2 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home विदर्भ शासकीय योजना पोहोचविण्यात नवमाध्यमांचा प्रभावी वापर;संचालक डॉ. गणेश मुळे यांच्याकडून कार्याचा गौरव

शासकीय योजना पोहोचविण्यात नवमाध्यमांचा प्रभावी वापर;संचालक डॉ. गणेश मुळे यांच्याकडून कार्याचा गौरव

0
14

जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांचा सत्कार व सेवानिवृत्ती सोहळा

नागपूर, दि. 31 : जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी आपल्या सेवाकाळात शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात केलेला नवमाध्यमांचा वापर आणि जनसंपर्क क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे. शासनाची सकारात्मक प्रतिमा जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांची कामावर असलेली निष्ठा माहिती विभागासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील,असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर – अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. रापतवार हे नियत वयोमानानुसार आज 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहामध्ये आयोजित एका बैठकीत संचालक डॉ. गणेश मुळे बोलत होते.

अमरावती विभागाचे उपसंचालक अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, मंगेश वरकड, श्रीमती शैलजा दांदळे, राजेश येसनकर, श्रीमती अंजू कांबळे, गजानन जाधव, सहायक संचालक (माहिती) श्रीमती अपर्णा यावलकर, अतुल पांडे, अनिल गडेकर, अविनाश महालक्ष्मे तसेच श्री. रापतवार यांच्या पत्नी वर्षा आणि कन्या निकेता रापतवार यावेळी उपस्थित होत्या.

श्री. रापतवार यांनी आपल्या कार्याप्रती नेहमी सजगता बाळगली. सर्व परिस्थितीत सकारात्मकता जोपासली. त्यामुळे ते उत्कृष्ट अधिकारी ठरले. पदे ही बिरुदावली असतात. आपली ‘स्व’ ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे. श्री रापतवार यांनी आपल्या कार्यातून आपली ‘स्व’ ओळख निर्माण करून आपला कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. ही कार्यशैली, येथील अनुभव त्यांना निवृत्तीनंतरच्या नवीन जबाबदाऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास संचालक डॉ. मुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना श्री. रापतवार म्हणाले, माहिती खात्यातील सेवा ही केवळ एक नोकरी नसून जनतेशी नाळ जोडणारे माध्यम आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि पत्रकारांचे प्रेम यामुळेच मी ही वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. मिळालेले प्रेम व सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी नागपूर संचालक कार्यालयाच्या वतीने संचालक डॉ.गणेश मुळे यांनी श्री. रापतवार व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा रापतवार यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांनी त्यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पुढील निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा यावलकर यांनी, तर आभार श्रीमती अंजू कांबळे यांनी मानले. यावेळी नागपूर संचालक कार्यालयातील तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.