23.8 C
Gondiā
Wednesday, September 2, 2026
Home विदर्भ सहाय्यक कामगार आयुक्तांच्या परिपत्रकानुसार किमान वेतन लागू करा; तुमसर नगर परिषदेकडे कामगारांची...

सहाय्यक कामगार आयुक्तांच्या परिपत्रकानुसार किमान वेतन लागू करा; तुमसर नगर परिषदेकडे कामगारांची मागणी

0
6

​सफाई कामगारांच्या किमान वेतनासाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

​तुमसर (प्रतिनिधी): तुमसर नगर परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार सुधारित किमान वेतन दर तात्काळ लागू करण्यात यावेत, या मागणीसाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.
​महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत सहाय्यक कामगार आयुक्त, भंडारा यांनी दि. १३ ऑगस्ट २०२६ च्या परिपत्रकानुसार परिमंडळ-२ साठी कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगारांचे मूळ वेतन आणि विशेष महागाई भत्ता असा सुधारित किमान वेतन दर निश्चित केला आहे. या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी तुमसर नगर परिषदेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांसाठी करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
​सफाई कामगारांना मिळणाऱ्या मजुरीमध्ये कोणतीही तफावत न ठेवता त्यांना नियमानुसार साप्ताहिक सुट्टीचे वेतन आणि इतर वैधानिक सुविधा पुरवण्यात याव्यात, असे निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.​याप्रसंगी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हर्ष कठाने, सफाईगार गोविंद भोंडेकर, मुकेश उपरीकर, शुभम राऊत, घनश्याम सोनावणे, संदीप नंदागवली, विनोद सरादे, मंगेश आलमकर, सन्नी सांडेकर, इशू मोगरे, राकेश धांडे, सरविंद मलाधारे, पांडुरंग कुंभलकर, अक्तर सय्यद व निशांत मेश्राम मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

​”सफाई कामगार शहराच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळतात, त्यामुळे त्यांना शासकीय नियमानुसार हक्काचे किमान वेतन आणि वैधानिक सुविधा मिळाल्याच पाहिजेत. कामगारांच्या या रास्त मागण्या मान्य करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे.”
— अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन तुमसर, जिल्हा भंडारा.

​”घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून येत्या पंधरा दिवसांत कंत्राट काढण्यात येणार आहे. नवीन कंत्राटामध्ये कामगारांना किमान वेतन देण्याबाबतच्या अटी व शर्ती समाविष्ट केल्या जातील आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असेल. ठेकेदाराकडून या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास कंत्राट रद्द करण्यात येईल.”
​— करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी, नगर परिषद तुमसर.