बालगोपालांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगला पारंपरिक सोहळा; नंदी सजावट व दौड स्पर्धेत चिमुकल्यांचा उत्साह
चित्रा कापसे/ तिरोडा -स्थानिक सिव्हिल लाईन्स परिसरात पारंपरिक तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील लहान मुले-मुली, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिव्हिल लाईन्स परिसरात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा गेल्या जवळपास ३० वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या परंपरेतून बालकांना आपल्या संस्कृती व कृषी परंपरेची ओळख करून देण्याबरोबरच सण-उत्सवातील सामूहिक सहभागाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.
तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुलांच्या आकर्षक वेशभूषा, नंदी सजावट तसेच दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी विविध रंगीबेरंगी वेशभूषा करून तसेच सुंदर सजविलेले नंदी घेऊन मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. दौड स्पर्धेतही मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये माजी मुख्याध्यापक पी. डी. खणंग, विमा अधिकारी अमृत देशपांडे, माजी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, डॉ. संजय रहांगडाले, डॉ. श्रद्धा रहांगडाले, शहर भाजप अध्यक्ष नितीन पराते, रमेश पराते, सागर खणंग, वैभव रावत, विशाल रावत, रुचिर रहांगडाले, हेमंत बघेले, लाला चौहान यांच्यासह परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चिमुकल्यांच्या उत्साहाने आणि पारंपरिक वातावरणामुळे सिव्हिल लाईन्स परिसरातील तान्हा पोळा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला.





