
चंद्रपूर,दि.05- महाराष्ट्र शासनासोबत बांबु प्रशिक्षण केंद्र व इतर काही प्रकल्पांबाबत सामंजस्य करार करताना मी विशेष आनंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नवे विकसित रूप तयार करण्याची संकल्पना जाहीर करून त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. त्याचे प्रतिबिंब चंद्रपूरात बघायला मिळत आहे. या प्रक्रियेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले आहे. येथील उत्साही वातावरण बघुन मी प्रभावित झालो आहे. चंद्रपूर जिल्हा निश्चीतपणे विकास प्रक्रियेत अग्रणी जिल्हा ठरेल व या प्रक्रियेत टाटा ट्रस्ट राज्य शासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी दिली.चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासनाचा वनविभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात बांबु प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य कराराच्या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात आज दि.5 ते बोलत होते.
यावेळी मंचावर विख्यात उद्योगपती रतन टाटा, वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, टाटा ट्रस्टचे मॅनेजींग ट्रस्टी श्री. व्यंकटरमनन, खा. अशोक नेते, आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे, आ. देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, महापौर सौ. राखी कंचर्लावार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. चंदनसिंह चंदेल, वनविभागाचे सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे सचिव श्री. गिरीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह, मुख्य वनसंरक्षक श्री. शेळके, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टाटा ट्रस्ट या शिर्षकातच विश्वास असुन टाटा म्हणजे गुणवत्ता आणि प्रगती यांचे प्रतीक आहे. बांबु प्रशिक्षण केंद्राच्या सामंजस्य करारानिमीत्त श्री. रतन टाटा चंद्रपूरात आले हे आमचे भाग्य आहे. बांबुच्या माध्यमातुन रोजगार निर्मीती, कौशल्य विकासासह प्रगतीची नवनवीन शिखरे आम्ही गाठू. पाठयपुस्तकात कल्पवृक्ष हा इच्छीत मनोरथ पूर्ण करणारा वृक्ष म्हणून आम्ही वाचले आहे. याच धर्तीवर बांबु कल्पवृक्ष ठरावा अशी अपेक्षा वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.चिचपल्ली येथील बांबु प्रशिक्षण केंद्र, घोट येथील अगरबत्ती प्रकल्प, बांबु बोर्डसाठी 5 कोटी रू., पोंभुर्णा व जिवती तालुक्यातील कुक्कुटपालन प्रकल्पासाठी 3 कोटी रू., जिल्हयातील रोजगारासंबंधीचे सुक्ष्म नियोजन अशा विविध प्रकल्पांसाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातुन मिळणारे सहकार्य आमच्यासाठी लाख मोलाचे आहे. टाटा हे विश्वास आणि गुणवत्तचे प्रतीक असुन त्यांच्या सहकार्याने रोजगार निर्मीतीचे लक्ष्य आम्ही पूर्ण करणार आहोत. जॉब सिकर्स नव्हे तर जॉब क्रिएटर्सची संख्या आम्हाला वाढवायची आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, गेली दिडशे वर्ष टाटा परिवाराने उद्योग क्षेत्राच्या माध्यमातुन देशाची सेवा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा कौशल्य विकास किंवा मॅक इन इंडिया सारख्या संकल्पना सांगतात त्यावेळी आमच्या डोळयासमोर टाटांचेच नाव येते. श्री. रतन टाटा यांना या जिल्हयाच्या विकासासाठी पाचारण करण्यात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार निश्चीतच अभिनंदनीय असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी केले. वन्य प्राण्यांच्या वेशभूषेतील शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी पाहुण्यांचे स्वागत केले. वाघाची प्रतीकृती भेट देत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. रतन टाटा, श्री. व्यंकटरमनन आणि टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार श्री. जगदीश सिंह यांचे स्वागत केले. यावेळी मुलुख चांदा या चंद्रपूर जिल्हयाचा इतिहास विशद करणा-या कॉफी टेबल बुकचे विमोचन श्री. रतन टाटा व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी केले तर आभार मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.