दगडी पहाडी क्षेत्रात पोलीस-नक्षल्यांमध्ये चकमक

0
9

गोंदिया दि.१७: गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील नक्षलबहुल क्षेत्रात पोलिसांना नक्षल कारवायांवर अंकुश मिळविण्यात यश आले आहे. परंतु, नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यातील घटनेतून दिसत आहे.

रविवारी (१५ जानेवारी) सायंकाळी सालेकसा तालुक्यातील दगडी पहाडी क्षेत्रात पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक झाली व नक्षल्यांनी साहित्य सोडून पळ काढला. जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, चिचगढ, केशोरी पोलीस ठाण्याअंतर्गत क्षेत्र अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. याच क्षेत्रात आजवर अनेक नक्षल घातपातांच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्हा पोलीस प्रशासनाने नक्षल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पाऊल उचलल्याने नक्षल्यांच्या कारवायांवर आळा बसलेला आहे. गेल्या वर्षी २0१६ मध्ये चिचगढ पोलीस ठाण्याअंतर्गत जंगल क्षेत्रात नक्षल्यांना पाहण्यात आले होते. विशेष म्हणजे, नवीन वर्षात नक्षल्यांनी पुन्हा सक्रिय होत असल्याचे गडचिरोली जिल्ह्यातील विविध नक्षली घटनांनी समोर आले आहे. या धर्तीवर नक्षल्यांचा सामना करण्यासाठी व घातपात उधळून लावण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनानेदेखील जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रात विशेष खबरदारी घेतली आहे. याअंतर्गत रविवारी (१५ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या सालेकसा तालुक्यातील दगडी पहाडी क्षेत्रात पोलीस गस्त घालत होते. अचानक काही नक्षल्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देताच नक्षल्यांनी आपल्याजवळील साहित्य घटनास्थळी सोडून पळ काढला.