यात्रेकरुंची गैरसोय होणार नाही यादृष्टीने काम करा- अभिमन्यू काळे

0
7

* कचारगड यात्रा पुर्वतयारीचा आढावा

गोंदिया,दि.१९ : देशातील लाखो आदिवासी बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक विविध राज्यातून येणार आहेत. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने विविध यंत्रणांनी योग्य समन्वय साधून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले.
१८ जानेवारी रोजी कचारगड येथे ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान पारी कुपार लिंगो मॉ कली कंकाली यात्रेच्या पुर्वतयारीचा आढावा घेतांना धनेगाव येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी काळे बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, पं.स. सभापती श्री फापनवाडे, धनेगावच्या सरपंच पुजा वरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, यात्रेदरम्यान भाविक कचारगड गुफेकडे जातांना चेंगराचेंगरी होणार नाही याकडे लक्ष दयावे. किती भाविक गुफेकडे दर्शनाला जातात याची गणना सीसीटीव्ही कॅमेरेद्वारा करावी. अनेक भाविक चारचाकी वाहनांनी यात्रेदरम्यान येत असल्यामुळे पार्कीगची व्यवस्था योग्यप्रकारे करावी. विहीरी व बोअरवेलमधील पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. त्यामुळे भाविकांना जलजन्य आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही. यात्रेदरम्यान शौचालयाची तसेच मोबाईल शौचालयाची व्यवस्था देवस्थान कमेटीने योग्य समन्वयातून करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार पुराम म्हणाले, यात्रेदरम्यान आदिवासी बांधवाची सिकलसेल तपासणी आरोगय शिबीरातून करण्यात येणार आहे. कचागरडच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेरे आदिवासी विकास विभागाने खरेदी करावे. वाहनाच्या पार्कीगची जागा देवस्थान समितीने उपलब्ध करुन दयावी. भक्तगणांची गैरसोय होणार नाही यासाठी भक्तनिवासाचे काम तातडीने सुरु करावे. कचागरडच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध विकास कामाची माहिती देवस्थान कमिटीला दयावी. असे ते म्हणाले.
डॉ. भुजबळ म्हणाले, यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी दहा विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार आहे. पार्कींगची व्यवस्थासुध्दा योग्यप्रकारे करण्यात येईल. कचारगड गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रतिबंध करण्यात येईल. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जातांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. प्रास्ताविकातून तहसिलदार सांगडे यांनी सांगितले की, यात्रेच्या पुर्वतयारीच्या दृष्टीनी ११ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यामध्ये नियोजन केले असून आरोग्य विभागाचे तीन पथक दिवसा व एक पथक रात्री यात्रेदरम्यान राहणार आहे. १०८ अम्बूलन्स सेवा यात्रेदरम्यान २४ तास राहणार आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही. विद्युत पथदिवे सुध्दा लवकरच लावण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान बससेवासुध्दा भाविकासाठी उपलब्ध राहणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता श्री बोरीकर, कार्यकारी अभियंता श्री वाकडे, गटविकास अधिकारी श्री खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचेसह विविध यंत्रणाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे पदाधिकारी रमणलाल सलाम, संतोष पंधरे, बारेलाल वरकडे, मनीष पुसाम, राधेश्याम पंधरे, सुरेश परते, केजूलाल भलावी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी केले. आभार शंकर मडावी यांनी मानले.
००००