काँग्रेसची भूमिका मांडण्याचे वंजारी यांना अधिकार

0
6

नागपूर,दि.16 : महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद प्रदेश काँगे्रसकडे न नेता काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यावर अविश्वास दर्शवून त्यांच्या जागी तानाजी वनवे यांची निवड केली आहे. या प्रकरणाची प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात काँग्रेसने यापूर्वीच मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. प्रदेश काँग्रेसने या प्रकरणात न्यायालयात पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांना दिले आहे. प्रदेश काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. गणेश पाटील यांनी वंजारी यांना याबाबतचे अधिकार पत्र दिले आहे. त्यानुसार वंजारी यांना न्यायालयात बाजू मांडण्याचे, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे तसेच वकिलांची नेमणूक व वकीलनाम्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे.

१६ मे रोजी काँग्रेसच्या बंडखोर गटाने बैठक घेतली. यात संजय महाकाळकर यांना बदलवून विरोधी पक्षनेतेपदी तानाजी वनवे यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार महाकाळकर यांना पदावरुन हटविण्याची मागणी बंडखोर गटाने विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी १६ सदस्यांचे पाठबळ असलेल्या तानाजी वनवे यांची नागपूर महापालिकेतील काँग्रेसच्या सदस्यांनी गटनेतेपदी केलेली निवड योग्य ठरविली होती. या निर्णयामुळे महाकाळकर यांना विरोधीपक्षनेते पदावरून पायउतार व्हावे लागले. महाकाळकर यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात काँग्रेसनेही मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेतील काँग्रेसच्या स्वीकृत सदस्याची निवड प्रलंबित ठेवण्यात आली आहे.