कार उलटली, पोलिसाचा मृत्यू

0
9

नागपूर दि.११- शेगाव येथून दर्शन घेऊन परत येणाऱ्या पोलीस दलातील मित्रांच्या कारला अपघात होऊन एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. हा अपघात हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातात दोन पोलिसांसह आणखी तीन असे पाच जण जखमी झाले.मनीष विश्वनाथ कडवे (२९, रा. सिरसपेठ, नागपूर) असे मृताचे नाव असून, ते सोनेगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. पोलीस शिपाई रोशन शंकराव निंबर्ते (३०, रा. सोमवारी क्वॉर्टर, नागपूर-नेमणूक नंदनवन पोलीस स्टेशन), पंकज संपतराव मसराम (२८, रघुजीनगर, नागपूर-नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन) यांच्यासह कारचालक सूरज पराते (२८, रा. नागपूर) शुभम नरेंद्र हरडे (२४, रा. न्यू नंदनवन ले-आऊट, नागपूर) तसेच एकाचा जखमींमध्ये समावेश आहे.मनीष हा राज्यस्तरीय धावपटू होता. आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी आणि मोनिका राऊत या मनीषच्या घराशेजारीच राहतात. त्यांनी सोबतच सराव करण्यास सुरुवात केली होती. प्रशिक्षक एस. जे. अ‍ॅन्थोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषने अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत.

नागपुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पाचही पोलीस मित्र शेगाव येथे एमएच-३१/डीके-५२०० क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने गेले होते. दर्शन घेऊन तेथून परत येत असताना मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यात मनीष कडवे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कारमध्ये बसलेले अन्य पाच जण जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात हलविले. याबाबत हिंगणा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८ सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक तिवारी, हेड कॉन्स्टेबल राजू भुक्ते, सोमेश्वर वर्धे करीत आहेत.