नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यासाठी बंदला शतप्रतिशत प्रतिसाद

0
7

सालेकसा,दि.23 : सालेकसा नगरपंचयातमध्ये आमगाव खुर्द ग्रामपंचायतला नगर पंचायतमध्ये समाविष्ट करा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२२) रस्त्यावर उतरुन शासन आणि प्रशासनाचा सर्वपक्षिय नेत्यांसह नागरिकांनी निषेध नोंदविला. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सालेकसा व आमगाव खुर्द येथे शुक्रवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.सोबतच ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.आमगाव खुर्दच्या सहभागाला लोकप्रतिनिधीचा का विरोध असावा असेही बोलले जात आहे.
शासनाने आमगाव खुर्दला नगरपंचायत घोषीत करण्याऐवजी तिथे ग्रामपंचायत निवडणूक लावली. त्यामुळे या विरोधात आमगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिक पक्ष भेद बाजूला ठेवून एकत्र आले. शुक्रवारी बंद पुकारुन रस्त्यावर उतरले होते. सालेकसा येथील संपूर्ण बाजारपेठ बंद होती. केवळ शासकीय कार्यालये सुरु होती. इतर सर्व प्रतिष्ठान दिवसभर बंद होती. त्यामुळे निवडणूक निषेधार्थ करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला व्यावसायीक व नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.
मागील अडीच वर्षापूर्वी राज्यात सर्व तालुकास्थळावरील ग्राम पंचायतीला नगर पंचायत म्हणून शासनाने घोषित केले. त्यानुसार सालेकसाही नगर पंचायत घोषित झाले. परंतु येथील लोकांचे दुदैव म्हणावे की खर्या अर्थाने नागरीकरण झालेला भाग जो सालेकसा म्हणून ओळखला जातो ते गाव आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये असून याच आमगाव खुर्दच्या हद्दीत सालेकसा तालुक्याच्या नावाने चालणारे सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालय, बँका, दवाखाने, शाळा-महाविद्यालय स्थित आहेत. ऐवढेच नव्हे तर तालुका मुख्यालय मानले जाणारे तहसील कार्यालय सुद्धा आमगाव खुर्दच्या हद्दीत आहे. त्यामुळे खºया अर्थाने शहरीकरण झालेला भाग परंतु आमगाव खुर्दमध्ये असलेला हा सालेकसा नगर पंचायतीत समाविष्ठ होणे गरजेचे होते. मात्र शासनाने नगर पंचायत घोषित न करता ज्या नावाने तालुक्याचे कामकाज चालते तेच गाव नगरपंचायत घोषित केले. परंतु सालेकसा ग्रामपंचायतमध्ये हलबीटोला, मुरुमटोला, बाकलसर्रा, जांभळी सारखी घनदाट जंगलातील गावे असून ती नगर पंचायतमध्ये आली. त्यामुळे शासनाच्या हेतू प्रमाणे निर्णय झाला नाही. आमगाव खुर्द हाच खरा सालेकसा असून सालेकसासह आमगाव खुर्दलाही सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ठ करावे अशी मागणी मागील अडीच वर्षापासून येथील नागरिकांकडून होत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी न्यायालयाचे दार सुद्धा ठोठावण्यात आले. येथील भौगोलिक परिस्थितीसुद्धा समजावून सांगण्यात आली. परंतु शासनाने याकडे लक्ष दिले नाही. आता राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या यादीत आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा सुद्धा समावेश असून अधिसुचना निघाली आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी या विरोधात शुक्रवारी बंद पुकारला होता. सकाळपासून सर्वच दुकाने व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली. यात भरतभाऊ बहेकार, बबलू कटरे, अजय वशिष्ठ, वासुदेव चुटे, लखनलाल अग्रवाल, विजय फुंडे, निर्दोष साखरे, विनय शर्मा, राहुल हटवार, निखील मेश्राम, रमेश फुंडे, मनोज डोये, दौलत अग्रवाल, प्रमोद चुटे, सचिन बहेकार, संदीप डेकाटे, योगेश राऊत, ब्रजभूषण बैस, अनिता चुटे, बबलू भाटीया, रिता दोनोडे, विमल कटरे, हर्षलता शर्मा, वर्षा साखरे, लीला शेंडे, लता फुंडे यांच्यासह आमगाव खुर्दवासीय यात मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.