पुरातन व सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी निधी

0
15

चंद्रपूर,दि.29 : चंद्रपूर या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून भरीव निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील नादुरुस्त व भग्नावस्थेतील वास्तुंचे पुनर्बांधकाम करण्यात यावे व यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली असता केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी यावेळी सर्व मागण्यांकडे विशेष लक्ष देत निधीची तरतूद केली जाईल, असे चर्चेदरम्यान आश्वासन दिले.
ना. हंसराज अहीर यांच्या नवी दिल्ली स्थित शासकीय निवासस्थानावर २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या चर्चेदरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना श्यामकुळे, वणी क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णी क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम, भाजपा नेते विजय राऊत, इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, रवींद्र गुरनुले, ऐतिहासिक वास्तुंचे अभ्यासक टी.टी. जुलमे आदींची यावेळी उपस्थिती होती.
केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे व परकोटांविषयक वारसा दर्शविणारी पुस्तिका यावेळी सादर करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील, संशोधन व संवर्धनाकरिता कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यात व लोकसभा क्षेत्रामध्ये दुर्लक्षित असलेल्या वास्तुंसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ना.अहीर यांनी केली. पर्यटन मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यास भेट देऊन या ऐतिहासिक, पुरातन वास्तुंचा परामर्ष घ्यावा, अशी विनंती सुद्धा ना. अहीर यांनी केली. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन विषयक सर्व बाबी व सूचनांची योग्य दखल घेऊन येथील ऐतिहासिक वारशांचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याची काळजी घेतली जाईल असे सांगितले.