प्रथमच नक्षल्यांचा गड अबुझमाडमध्ये पोलिसांनी राबविली मोहीम-अंकुश शिंदे

0
28

वर्षभरात ४० पोलिस – नक्षल चकमकी, १० नक्षल्यांचा केला खात्मा

गडचिरोली,दि. १५ – जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहीमेदरम्यान वर्षभरात आजपर्यंत ४० पोलिस – नक्षल चकमकी झाल्या. यामध्ये १० नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला. यापैकी ९ नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी हस्तगत केले तर एका नक्षल्याचा मृतदेह हाती लागला नाही. प्रथमच नक्षल्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाºया अबुझमाडमध्ये पोलिसांनी मोहीम राबवून नक्षल्यांचा कॅम्प उध्वस्त केला. येथून पहिल्यांदाच नक्षल्यांचे सहा घोडेसुध्दा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. यावर्षी दोनवेळा नक्षल्यांकडून घोडे जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी आज १५ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलिस उपअधीक्षक डॉ. महेंद्र पंडिल उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शिंदे पुढे म्हणाले, मागील वर्षभरामध्ये जिल्ह्यात ३ नक्षली कॅम्प उध्वस्त करण्यात आले. यामध्ये १३५ शस्त्रे, १५० किलो स्फोटके जप्त करण्यात आली. ६५ नक्षल्यांना अटक करण्यात आली तर २० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. नक्षल्यांकडून घडविण्यात आलेल्या घातपाताच्या घटनांमध्येसुध्दा घट झाली असून मागील वर्षी ७६ नक्षल गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी ६५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
मागील वर्षात नक्षल्यांनी १४ निष्पाप नागरिकांची हत्या केली होती. यावर्षी ७ जणांची हत्या केली आहे. अ‍ॅम्बुश, चकमक, नागरिकांच्या हत्या अशा गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येत असल्याचेही उपमहानिरीक्षक शिंदे म्हणाले. पोलिस विभागाच्यावतीने सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. तसेच पोलिस दलाच्यावतीने विविध कार्यक्रम, जनजागरण मेळावे आयोजित करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यामुळे नक्षलविरोधी मोहीमेत नागरिक सहभागी होत आहेत. यावर्षी नक्षल्यांची स्मारके उध्वस्त करून, बॅनर जाळून निषेध रॅलीच्या माध्यमातून नागरिक नक्षल्यांचा विरोध करीत आहेत.
यावर्षी प्रथमच ९ आॅगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त रॅली तसेच रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच जिल्हास्तरीय रेना नृत्य स्पर्धेचेसुध्दा आयोजन करण्यात आले होते. येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आयोजित पथसंचलनात रेला नृत्याला सहभागी करून राज्यपातळीवर पोहचविण्याचा मानससुध्दा पोलिस उपमहानिरीक्षक शिंदे यांनी व्यक्त केला. इतर कलाकारांप्रमाणे रेला नृत्य सादर करणाºया कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नक्षलवादाला पोलिसांनी मोठ्या ताकदीने प्रत्युत्तर देण्यासोबतच जनतेचासुध्दा सहभाग वाढविण्यास यश मिळविले आहे. यामुळे दुर्गम भागातील जनतासुध्दा नक्षलविरोधी सप्ताहात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहे. नक्षल्यांचे स्मारक, पोस्टर, बॅनर जाळून निषेध करीत आहेत. यामुळे ग्रामस्थांचा सहभाग म्हणजेच नक्षलमुक्तीच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल असल्याचेही शिंदे म्हणाले. जिल्ह्यातील नक्षल चळवळीत असलेल्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, असेही आवाहन त्यांनी केले.