वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन:युवक काँग्रेसने केले आंदोलन

0
11

गडचिरोली, दि.20 : समाजकल्याण विभागाद्वारे संचालित शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याने  रविवारला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याची माहिती मिळताच  युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी अन्नपदार्थांची पाहणी केली. यावेळी मिरची पावडरची पाकिटे मुदतबाह्य असल्याचे दिसून आले. पेयजलही दूषित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कावीळ व विषमज्वरासारख्या आजारांना बळी पडावे लागते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या वसतिगृहात एका कंत्राटदारामार्फत विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी केली.युवक काँग्रेसचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा सचिव एजाज शेख, आशिष कन्नमवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.