
गडचिरोली,दि.05: करोना विषाणूबाबत नागरीकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, याबाबत विशिष्ट काळजी घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. राज्यस्तरावरुन सर्व प्रशासनाला करोनाबाबत करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत सूचना देणेत आल्या आहेत. करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, त्यांनी कोणत्याही चूकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी बैठकीत आवाहन केले आहे. यावेळी बैठकीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुढे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, मुख्याधिकारी संजू ओव्हळ, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी गडचिरोली जिल्हयात करोना संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्व तयारीसाठी आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच जर संशयित रुग्ण जिल्हयात अढळल्यास त्याबाबत तपासणी करणेकरीता आरोग्य विभागाकडून तज्ञ डॉक्टर व सहायक यांची टीम तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
करोना आजारामध्ये व्यक्तीला मोठया प्रमाणात लक्षणे दिसून येत नाहीत. संसर्ग झालेल्या 100 पैकी 82 टक्के लोकांना काही त्रास दिसून येत नाही, त्यातील 15 टक्के लोकांना सौम्य ते मध्यम स्वरूपाचा त्रास वा लक्षणं व घराच्या घरी उपचार करून राहता येते तसेच फक्त 3 टक्के लोकांना दवाखान्यात भरती करण्याची गरज भासते. तेव्हा याबाबत लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. जर करोनाबाबत लोकांमध्ये अफवा पसरविल्या जात असतील तर त्याबाबत प्रशासनाला ताबडतोब कळवावे असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
करोना संसर्गाची प्रमुख लक्षणे – खोकला, ताप तसेच श्वसनामधील त्रास ही करोना लागण झाल्याची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र याबाबत योग्य तपासणीनंतरच करोना लागण झाल्याची खात्री करता येते. त्यासाठी नागरीकांनी घाबरुन न जाता, शंका आल्यास योग्य तपासण्या करुन घ्याव्यात .
करोनावर औषध नाही — करोना संसर्गावर आजपर्यत तरी कोणतेही औषध तयार झाले नाही. तेव्हा कोणीही त्याबाबत औषध आहे म्हणून लोकांची फसवणूक करत असेल अथवा संसर्ग होवू नये म्हणून हे औषध घ्या ते औषध घ्या असे सांगत असेल तर ती फसवणूक आहे. करोनावर औषध नसले तरी सध्या सावधगिरी हेच प्रमुख औषध आहे.
काळजी कशी घ्यावी – नागरीकांनी ताप, खोकला व श्वसन त्रास उद्भभवल्यास डॉक्टरांकडून योग्य ती तपासणी करुन घ्यावी. कोणीही खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. नेहमी हात स्वच्छ धुवावेत. अगदी साबणाने व पाण्याने स्वच्छ हात धुतले तरी चालतात. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या संपर्कात येणाऱ्या वस्तूंना स्पर्श करु नये. लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवावे. सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. संशयीत व्यक्तीबाबत जिल्हा प्रशासनाला कळवा.
तोंडाला मास्क वापरण्याची गरज नाही – करोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरण्याची अफवा पसरत आहे. त्यामुळे किमती वाढवून पुरवठादार मास्क विक्री करत आहेत. यात नागरीकांची फसवणूक झाल्याचे काही जिल्हयांत समोर आले आहे. लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, या संसर्गापासून वाचण्यासाठी सामान्य लोकांनी मास्क वापरु नये. मास्क वापरण्याच्या सूचना फक्त संसर्ग झालेली व्यक्ती व त्याबाबत आरोग्य सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना आहेत.
या नंबरवर संपर्क करा – जर करोनाबाबत लक्षणे आढळल्यास, त्याबाबत शंका असल्यास अथवा विविध अफवांची पडताळणी करावयाची असल्यास 07132-222340 या जिल्हा सामान्य रुग्ण्यालय गडचिरोली येथील दुरध्वनीवर संपर्क करावा. याच बरोबर 104 किंवा 011 23978046 या शासनाच्या टोल फ्री क्रमांकावरही याबाबत माहिती विचारु शकता.