वाशिम, दि. ०९ : विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) शेतकऱ्यांसाठी शेततळे खोदकाम, प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन संच, भाजीपाला अथवा फळबाग लागवडीसाठी बी-बियाणे इत्यादी घटक अनुदानावर राबविण्यात येणार आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी पुढील ग्रामसभेच्या मान्यतेने आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडे किमान ०.६० हेक्टर जमीन असणे तसेच शेतकरी हा दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.




