29.8 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही – जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही – जिल्हा आरोग्य अधिकारी

0
84

गोंदिया दि. 9:-: चीनमधील घातक विषाणुच्या अनुषंगाने गोंदिया येथील केटीएस सामान्य रुग्णालय तसेच शासकीस वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांचे संयुक्त वतीने 6 मार्चला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राऊत, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, प्रा.डॉ.सुभाष ठाकरे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.निर्मला जयपुरिया, स्त्रीरोग तज्ञ डॉ.रत्नपारखी, डॉ.सुशांकी कापसे, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ.गुप्ता, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी कोरोना विषाणुबद्दल घ्यावयाची दक्षता तसेच आवश्यक उपाययोजना बाबत माहिती दिली. त्या अनुषंगाने जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय गोंदिया येथे विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. कोरोना विषाणुविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असले तरी जिल्ह्यात एकही संशयीत रुग्ण आढळून आला नसल्याने सामान्य नागरिकांनी माक्स लावून फिरण्याची आवश्यकता नसल्याचे तसेच या रोगाचा प्रसार पाहता आवश्यकता नसल्यास सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगून या आजाराने ग्रस्त संशयीत रुग्णाचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या नागरिकाबाबत सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी राज्यात पुणे, मुंबई व नागपूर येथे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून जिल्ह्यात जर कोरोनाचा रुग्ण दाखल झाल्यास सदर रुग्णाचे नमूने घेवून इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्याची सोय केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे करण्यात आली आहे. याकरीता टोल फ्री क्रमांक 104 व राज्यस्तरीय दूरध्वनी क्रमांक 02026127394 या क्रमांकावर शंकांचे समाधान करण्यात येईल.

प्रा.डॉ.दिलीप गेडाम, प्रा.डॉ.मनोज तालापल्लीवार, प्रा.डॉ.कासवान, प्रा.डॉ.खुशबू यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.एन.जी.अग्रवाल यांनी केले.