मोहाडी,दि.16ः-विदर्भात ६00 वर्ष संपणार नाही इतका लोह खनिज व कोळसा शिल्लक असून सध्या शेकडो कोटी रुपये महसूल येथून प्राप्त होत असल्याने वेगळा विदर्भ करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते विरोध करीत आहेत. जर विदर्भ वेगळा झाला तर चार लाख नवीन नोकर्या उत्पन्न होतील व येथील बेरोजगार तरुणांना काम मिळेल, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केले.
विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा मोहाडीची बैठक विश्रामगृह मोहाडी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.सभेला जिल्हाध्यक्ष देविदास लांजेवार, युवा आघाडी अध्यक्ष नागपूरचे मुकेश मासुरकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उषाताई, जिल्हा संघटक विनोद बाबरे, तालुकाप्रमुख सुखदेव पात्रे, ज्ञानेन्द्र आगाशे, भाऊराव बनसोड, अशोक बुरडे, सुरेंद्र कुंबले, सदन देशमुख, आकाश निमकर, भूषण कुंभारे, अनिल भुरे उपस्थित होते.
यावेळी राम नेवले यांनी बोलताना सांगितले की, दि. २८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपूर करार करण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाला २३ टक्के नोकर्या, २३ टक्के विकास निधी, मंत्रिमंडळात २३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र सर्वच सरकारांनी या कराराचा भंग केला. विदर्भाच्या चार लाख नोकर्या पळविल्या, उच्च पदाच्या नोकर्यांत २३ टक्के ऐवजी फक्त अडीच टक्के पदे दिली, ७५ हजार कोटी सिंचनाचे पळविले. विदर्भात आजही १२१ धरणे अपूर्ण आहेत. जर हे धरणे पूर्ण झाले असते तर, दहा लाख हेक्टर जमीन सुपीक झाली असती, आणि दीड लाख कोटी शेतकर्यांचे उत्पन्न वाढले असते. ३0 लाख कृषीआधारीत रोजगार वाढले असते. विदर्भाला कोरडा ठेवल्यामुळेच इथे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पिकविणारे आत्महत्या करीत नाहीत कारण त्यांना मुबलक पाणी मिळतो. महाराष्ट्र सरकारवर सहा लाख ७१ हजार कोटी रुपये कर्ज आहे. आणि त्याचा ३0 हजार कोटी रुपये फक्त व्याज भरावे लागतात. त्यामुळे कधीकधी शासकीय कर्मचार्यांचा पगार देणे ही सरकारला अवघड जाते. तर नवीन नोकर्या कुठून देणार? महाराष्ट्रात इतकी वीज निर्मिती होते की वेगळा विदर्भ झाल्यावर प्रत्येकाला २00 युनिटपयर्ंत वीज मोफत देऊन नंतरच्या युनिटचे बिल अर्धे द्यावे लागतील, आणि वाचलेली वीज विकून हजारो कोटी रुपये उत्पन्न मिळेल.
विदर्भात मुबलक प्रमाणात खनिज संपत्ती, जंगल संपत्ती असल्याने विदर्भ राज्य देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून उदयास येईल आणि बेरोजगारी संपेल. त्यामुळे या आंदोलनात युवकांनी मोठय़ा संखेत सामील व्हावे, प्रत्येक घरातून एक तरुण विदर्भ आंदोलनाला द्यावा आम्ही तुम्हाला वेगळा विदर्भ देऊ, रोजगार देऊ, नोकर्या देऊ आणि १ मे रोजी होणार्या बंदला यशस्वी करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.





