जंतर मंतरवर जनगणनेसाठी ओबींसीचे धरणे

0
220

भंडारा,दि.16ः- ओबीसी वर्गाच्या जनगणनेसाठी संघर्ष करीत असलेल्या आणि महाराष्ट्र व इतर विधानसभेत तसा प्रस्ताव पारित करून घेतलेल्या ओबीसी संघटानानी नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर धडक देऊन धरणे आंदोलन केले.समाजवादीचे खा. विश्‍वभर प्रसाद, राकाँचे डॉ. अमर कोल्हे, भाजपाचे खा. डॉ. प्रितम मुंडे आदींनी हा विषय सभागृहात उपस्थित करून ओबीसींची जनगणना करण्याची मागणी लावून धरली.
धरणे आंदोलनात भारतीय ओबीसी पिछडा संघटन, महाराष्ट्र ओबीसी जनगणना समन्वय समिती राजुरा, बल्लारपूर, स्वराज्य क्रांती फाऊंडेशन, मातोश्री ओबीसी परिवार चंद्रपूर, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट चंद्रपूर, राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन बीड, मराठा सेवा संघ नवी दिल्ली, ओबीसी सेवासंघमहाराष्ट्र या संघटना व देशभरातील ओबीसी नेते सहभागी झाले होते.
दरम्यान, भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्र भाजपचे खा. सुनिल मेंढे यांना निमंत्रित करण्यात आले असता त्यांनी भेट देण्याचे नाकारले. तसेच असे केले तर देशात अराजकता माजेल, असे म्हणून ओबीसी जनगणना करण्याच्या मागणीचा विरोध केला.भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे जनगणना आयुक्तांनी दि. १ जानेवारी २0२0 रोजी काढलेल्या २0२१ च्या जनगणनेच्या अधिसूचना क्र. का.आ.१२0(अ) मध्ये दिलेल्या अँटम क्र. १0 मध्ये फक्त एस. सी., एस. टी. व अन्य असे नमूद आहे. त्यात ओबीसींचा समावेश नाही. याचा स्पष्ट अर्थ असा की, १ एप्रिल २0२0 पासून सुरू होत असलेल्या २0२१ च्या जनगणनेत ओबीसींची गणना केली जाणार नाही. सरकारची तशी इच्छाही दिसत नाही. त्यामुळे ओबीसी वर्गावर होत असलेला अन्याय तसाच सुरू राहील. तो यापुढेही शासकीय सोयीसवलतींपासून वंचित राहील. त्यामुळे ओबीसी वर्गात प्रचंड असंतोष व नाराजी असून ती केव्हाही स्फोटक रुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री व गृहमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून जनगणनेच्या अधिसुचनेत अँटम क्र. १0 मध्य एस. सी., एस. टी. नंतर ओबीसींचा समावेश करून ओबीसींची गणना करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पंतप्रधान व गृहमत्र्यांना निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व मुख्य संयोजक बळीराज धोटे,ज्ञानेश्वर गोबरे,विलास काळे,संजय मते, सुकराम देशकर, निकेश पिने,ओबीसी नेत्या अँड. अंजली साळवे, विद्यार्थी नेता उमेश कोराम, राम वाडीभस्मे यांनी केले.