नागरिकांनी संसर्गाची काळजी करावी,जीवनावश्यक वस्तूंबाबत नाही : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

0
136

गडचिरोली,दि.26 : महाराष्ट्र राज्यात संचार बंदी ही अगोदरच लागू झाली होती आता सर्व भारतात आहे, आपल्या जिल्हयात नागरीकांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी करावी, प्रशासन जीवनावश्यक वस्तूंबाबत आवश्यक उपाययोजना राबवित आहे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जिल्हयातील आवश्यक दैनंदिन उपयोगाच्या वस्तू नागरीकांना वेळेत मिळण्यासाठी दुकाने सुरू आहेत. भाजीपाला, दूध व किराणा दुकानांमध्ये साठा करण्यासाठी नागरीकांनी गर्दी करू नका. करोना संसर्ग रोखण्यासाठी आपण संचार बंदी केली आहे. बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्या. इतर लोकांपासून आवश्यक अंतर ठेवून रहा असे जिल्हाधिकारी यांनी निवेदन केले आहे.
अकारण बाहेर फिरण्यावर स्वत:हून बंदी घाला, पोलीसांना सहकार्य करा नाहीतर नाईलाजास्तव त्यांना सक्तीने कारवाई करावी लागेल. करोना संसर्गाची काळजी प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संचार बंदी नंतर सामान्य जनजीवन काही प्रमाणात बिघडले आहे. परंतू आपणाला आता हळूहळू घरी राहण्याची सवय लावावी लागेल. पुढचे २० दिवस महत्त्वाचे आहेत, आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी या जागतिक संसर्गाला लढा देणे आता गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

करोनाबाबत गांभियर्ता समजून घेण्याची गरज : शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, गडचिरोली
सर्व सामान्य नागरीकांनी करोना संसर्गाबाबत गांभियर्ता समजून घेणे गरजेचे आहे. प्रशासनाला जीवनावश्यक वस्तूंबरोबर आरोग्य विषयक सुविधांबाबतही तयारी करावयाची आहे. पोलीस रस्त्यावर नागरीकांना संचार बंदीबाबत सूचना करत आहेत. अशावेळी हा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जनतेने सहकार्य करून लोक एकत्र येवू नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. युवकांचे बाहेर फिरण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यांना सूचना आहे की त्यांनी स्वत:ला आवरा, पोलीस आता अधिक सक्तीने संचार बंदीची अंमलबजावणी करणार आहे. तसेच विविध धार्मिक स्थळांवरील गर्दीही पुर्णपणे बंद करण्यात आली आहे, त्या ठिकाणी फक्त एक व्यक्तीच पुजाआर्चा करण्यासाठी राहील. संचार बंदी ही सर्वांनाच लागू आहे त्यामुळे आतावश्यक सेवा सोडून कोणीही बाहेर जाणे टाळावे.

जिल्हयात १३ लोक घरीच क्वारंटाईनमध्ये : गडचिरोली जिल्हयात आता १३ लोकांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन करण्यात येत आहे. एकुण ३६ पैकी उर्वरीत सर्व लोकांचा निरीक्षण कालावधी संपून त्यांना क्वारंटाईनमधून बाहेर केले आहे.

जिल्हयाबाहेरून करोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या ५९५० लोकांच्या हातावर शिक्के मारण्याचे कार्य प्रगतीपथावर : गडचिरोली जिल्हयात करोना बाधित क्षेत्रातून आलेल्या मागील १५ दिवसांमधील लोकांवर आरोग्य विभाग नजर ठेवून आहे. कालपासून त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना निरीक्षणाखाली घेणेत येत आहे. त्यांना घरातून बाहेर फिरण्यास मज्ज्वाव करण्यात आला आहे. यासर्व लोकांना विनंती आहे की आपण किमान १४ दिवस आता इतर लोकांच्या संपर्कात येवू नये. त्यांच्या आसपास राहणा-या नागरीकांनी त्यांचा संपर्क कमी करून संबंधितांना संसर्गाबाबत गांभियर्ता पटवून द्यावी. त्यांना घरात राहण्यास प्रोत्साहन द्यावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरीही या लोकांनी सूचनांचे पालन न केल्यास त्यांना शासकिय रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये सक्तीने ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.