नॅरोगेज प्लॅटफार्मचा विकास कधी ?

0
10

नागपूर दि.१४: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नॅरोगेज प्लॅटफार्मच्या विकासासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एक कोटी रुपये दिले. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अद्याप या प्लॅटफार्मवर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर नॅरोगेज प्लॅटफार्म आहे. या प्लॅटफार्मवर अनेक सुविधांचा अभाव आहे. हा प्लॅटफार्म दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या प्लॅटफार्मच्या विकासासाठी एक कोटी रुपये दिले. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने वर्षभर पैसे मिळूनही या प्लॅटफार्मच्या विकासासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही. प्रसारमाध्यमांनी सातत्याने टीका केल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तात्पुरती डागडुजी करून या प्लॅटफार्मचा विकास केल्याचा भास निर्माण केला. परंतु सध्या या नॅरोगेज प्लॅटफार्मवर अनेक सुविधांचा अभाव आहे. प्लॅटफार्मवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याशिवाय प्लॅटफार्म परिसरात पाणी साचते. साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.