रुग्णाला कोणत्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये- राजेश खवले

0
183

गोंदिया दि 4; जिल्ह्यातील नागरिकांना विविध आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यात अंगीकृत खाजगी रुग्णालयांची निवड केली आहे. ह्या रुग्णालयांनी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये. अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांनी दिल्या.

जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात नुकतीच या योजनेच्या जिल्हा पातळीवरील चमूसोबत बैठक श्री.खवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

श्री खवले पुढे म्हणाले, या दोन्ही योजनेच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित रुग्णालयाविरुद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. या योजनेअंतर्गत ज्या रुग्णालयाचे काम समाधानकारक नाही त्यांना नोटीस बजावण्यात येईल. संबंधित रुग्णालयांनी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योजनेबाबतची सविस्तर माहिती द्यावी. जेणेकरुन जास्तीत जास्त रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना देखील  योजनेची माहिती द्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.या बैठकीला राज्य आरोग्य हमी योजनेचे जिल्हा समन्वयक, अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे जिल्हा प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक व योजनेचे आरोग्य मित्र उपस्थित होते.