देवरी येथे रानभाज्या महोत्सव साजरा

0
350

देवरी,दि. 7 : : आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात पारंपारिक व दुर्मिळ रानभाज्या असंख्य प्रमाणात आढळतात. त्या रानभाज्यांचे संवर्धन करणे व स्थानिक बाजारपेठेत विक्री व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन आमदार सहसराम कोरोटे यांनी केले.देवरी येथे कृषि विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमीत्त रानभाज्या महोत्सव व विक्री व्यवस्था कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

आदिवासी बहुल जंगलव्याप्त भागात दुर्मिळ रानभाज्या कंद, शेंगा, फळे हे जून, जुलै, ऑगस्ट या खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढतात. उदा. केवकांदा, रानभेंडी, रानकाकडी, शेरडिरे, काटवल, मास्टर भाजी, पातुर भाजी, खापरखुटी, कमरमोडी, कर्मणभाजी, कोलारी भाजी, अरतफरी, लेंगडा भाजी, केना, दुधपाना, ऊंदीरकान, सुरण, कमलकंद, भुछत्रे इत्यादी औषधी गुणधर्म असलेले तसेच मानवी आरोग्यास अतिशय सकस व उपयुक्त असणाऱ्या अशा असंख्य दुर्मिळ रानभाज्या यांचे जिवंत नमुने याप्रसंगी रानभाजी महोत्सवात ठेवण्यात आले होते. वरील सर्व रानभाज्यांचे स्वयंस्पष्टीकरणचे पत्रके सुध्दा लावण्यात आले होते. त्यामुळे महोत्सवात रानभाज्यांची व्यापक प्रमाणात माहिती उपलब्ध झाली. या महोत्सवात महिला बचतगटामार्फत रानभाज्यांची विक्री सुध्दा करण्यात आली.

 कार्यक्रमास माजी  जि.प.सदस्य उषा शहारे,माजी पं.स.सदस्य अर्चना ताराम,  तालुका कृषि अधिकारी जी.जी.तोडसाम, संदिप भाटीया, बळीराम कोटवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवरीचे मंडळ कृषि अधिकारी विकास कुंभारे, चिचगडचे मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत कोळी, कृषि अधिकारी प्रकाश भुजबळ तसेच सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, कार्यालयीन कर्मचारी, प्रगतीशील शेतकरी, कृषि मित्र यांनी सहकार्य केले. संचालन मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषि पर्यवेक्षक एस.वाय.येडाम यांनी केले.